शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुर येथील सभेत भाजपावर जोरदार टीका केली. भाजपाने आपल्या पक्षात जी खोगीर भरती केलेली आहे. हे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना मान्य आहे का ? भाजपा सोबत असला तर साधू संत आणि दुसऱ्याकडे गेला तर चोर असा भाजपाचा खाक्या आहे. हे तुमचं हिंदुत्व कुठलं ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की हा शिवरायांचा पुतळा अप्रतिम रित्या तयार केला आहे. हा पुतळा आधीच तयार होता. परंतू मी पाऊस असल्याने थोडे थांबायला सांगितले.एक लाजीरवाणी घटना कोकणात घडली. केवळ लोकसभा निवडणूका जिंकायच्या म्हणून नौदल दिनाचे निमित्त साधून शिवरायांचा या पुतळ्याच्या उद्घाटनाचा घाट घातला. आम्हाला अभिमान आहे. परंतू ज्याने देशाचे आरमार प्रथम उभे केले त्या शिवरायांचा पुतळा उभारतानाही तुम्ही पैसे खाल्ले असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की भाजपासोबत असला की साधू संत. दुसऱ्याकडे गेला तर चोर. हे तुमचं हिंदुत्व कुठलं. भाजपचं हिंदुत्व थोतांड आहे. नागपूर हे संघाचं मुख्यालय आहे. मी मोहनजींना विचारतो की, आम्ही तुम्हाला हवेत की नको ते सोडा. पण ज्या पद्धतीने भाजप हिंदुत्वाचा थयथयाट करत आहेत ते तुम्हाला मान्य आहे का. भ्रष्टाचारी आणि इतरांना घेतलं जात आहे हा असला भाजपा संघाला मान्य आहे का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
संत्र्यांच्या शेतकऱ्यांची हालत बेकार झाली. कापूसवाल्यांची हालत कशी आहे. भाजपची हालत कशी झाली माहीत आहे माहीत आहे ना.संत्र्याला डिंक्या रोग येतो. खोडाला पोखरतो. भाजपला दाढीवाला ढिंक्या रोग झाला. खोड पोखरतो. कापसावर गुलाबी अळी पडते. जॅकेट असते की माहीत नाही. भाजपचं रोपटं संघाने पोसलं त्याला गुलाबी अळी आणि डिंक्या रोग लागलाय. हा भाजप तुम्हाला मान्य आहे का मोहनजी असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
आपण लोकसभा जिंकली आहे. विधानसभा जिंकायची आहे. हे धर्माधर्मात मारामारी करीत आहेत. लावालावी करत आहे. असे हे गोमूत्रधारी हिंदुत्व भाजपचं आहे. लोकं मेले तरी चालेल पण आम्हीच सत्तेवर बसणार असे यांचे सुरु आहे. दसरा मेळावा शिवतिर्थावर घेणार. त्यानंतर आपण महाराष्ट्र फिरणार आहे असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी घोषीत केले.