गणेश सोळंकी, बुलढाणा | 19 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षण मिळावे, यासाठी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. ओबीसींची मागणी सुद्धा रास्त आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आरोप – प्रत्यारोप करून राज्याचे सामाजिक वातावरण बिघडवण्याची शक्यता आहे. आपला हक्क आणि अधिकार प्रत्येकाने मागितला पाहिजे. हे कायद्याचे राज्य आहे याचे पालन करत आपली मागणी रेटावी. ओबीसी विरुध्द मराठा हे दुर्दैवी आहे. एकमेकांना चिथावणी देणारे किंवा महाराष्ट्राचे वातावरण दूषित करणारे वक्तव्य कोणीही करू नये असे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले आहेत.
उबाठा गट आणि संजय राऊत सह मंडळींना मीडियासमोर राहण्यासाठी काही तरी उचापती सुरू केल्या आहेत. सत्ता जाऊन दीड वर्ष झाले तरी सत्तेतून खाली उतरायला ते तयार नाही. सत्तेची नशा त्यांच्यात भरलेली आहे. सत्तेत नसताना सत्ताधाऱ्यांसारखे विकासकामांचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न करतात. ज्यांचे सरकार आहे तेच विकासकामांचे उद्घाटन करत असतात. आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि आमदार यांची ही स्टंटबाजी आहे. शासनाने यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार जाधव यांनी केली.
नामदेव जाधव व्याख्याते आहेत आणि मराठा आहेत. त्यांनी एका वेबसाईट वरून सर्टिफिकेट काढून व्हायरल केले. यात नामदेव जाधव यांचा काय गुन्हा? जर ओबेसी सर्टिफिकेट फेक असेल तर संबंधित वेबसाईटवर कारवाई करायला पाहिजेत. शरद पवार, रोहित पवार यांनी एकदाच जाहीर करावे, की आम्ही मराठा आहोत की ओबीसी आहोत. त्यानतंर त्या वादावर पडदा पडेल असा टोला जाधव यांनी यावेळी लगावला.
पुण्यात नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासण्यात ले. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. याचा आम्ही निषेध करतो. ज्यांनी हे कृत्य केले त्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रामाचे दर्शन मोफत हवे असेल तर मतदान करा असे काही म्हटले नाही. चुकीच्या पद्धतीने वाक्य त्यांच्या तोंडी घातले आहे. मोफत दशन होईल हे त्यांनी म्हटले नाही. हे सर्व चुकीच्या पद्धतीने रंगवले जात आहे. कोणतीही नेता असे म्हणू शकत नाही, असेही खासदार जाधव म्हणाले.