मुंबई : खासदार प्रतापराव जाधव यांचे धाकटे बंधू, माजी नगराध्यक्ष संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे सगळीकडे फलक लावले. संजय जाधव यांनी लावलेले फलक पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. प्रतापराव जाधवांशी यांच्या भूमिकेशी फारकत घेतली. संजय जाधव हे उद्धव ठाकरेंसोबत जाणे म्हणजे प्रतापराव जाधव यांना धक्का मानायचा की, खासदारांची राजकीय खेळी अशी चर्चा सुरू झाली. यासंदर्भात प्रतापराव जाधव म्हणाले, आमचे बंधुराज हे राजकीय अपेक्षेनं (Political Expectations) उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) गेलेत. आम्ही एकनाथ शिंदेसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हीही त्यांना शुभेच्छा दिल्या. राजकीय अपेक्षा प्रत्येकाला असतात. मात्र कुटुंबात विवाद नाहीत. माझ्या जिल्ह्यात मी शिवसेनेचा संस्थापक आहे. आम्हाला गद्दार म्हणणं योग्य नाही. जे बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली द्यायला निघाले त्यापासून आम्ही वाचवलं.
खरी शिवसेना कोणती, याबाबत अजूनही संभ्रम आहे. हे प्रकरण आता न्यायालयात पोहचले. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत. परंतु, एकनाथ शिंदे गटाकडं शिवसेनेचे आमदार व खासदारही मोठ्या प्रमाणात गेलेत. त्यामुळं दोन्ही गट आम्हीच शिवसेना असा दावा करतात. यासंदर्भात शिवसेनेचे शिंदे गटात असलेले खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, आम्ही कायदेशीर गटनेता निवडला आहे. आमच्यावर कारवाई होऊ शकत नाही. गटनेत्यालाही अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. कोर्टात जरी गेले तरी निकाल आमच्या बाजूने लागेल. आम्ही पक्ष सोडलेला नाही. व्हीपचंही उल्लंघन केलं नाही. आम्ही शिवसेनेतचं आहोत.
एकनाथ शिंदेंनी एवढा मोठा निर्णय घेतला म्हणजे सगळ्या बाजू तपासल्या असतील. सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागेल. एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून आम्ही मान्यता दिली आहे. पक्ष प्रमुख कोण या प्रश्नावर पक्षाची घटना माहिती नाही म्हणून प्रतापराव जाधव यांनी उत्तर देणं टाळलं. असं सार असलं तरी संजय जाधव यांच्या कृतीवरून राजकीय अपेक्षेने गेल्याच सांगत आहेत. एकंदरित सावध पावित्रा खासदार प्रतापराव जाधव यांनी घेतला आहे. त्यामुळं ही काही वेगळी खेळी तर नाही, अशी शंका घेण्याचा वाव आहे.