मुंबई : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा(Jai Jai Maharashtra Majha)… हे स्वर ऐकताच प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभा राहतो. महाराष्ट्र दिन अणि शिवजयंतीला हमखास हे गाणं मोठ्या आवाजात वाजवले जातो. हे गाणं ऐकताना महाराष्ट्रातील जनतेचा ऊर अभिमानाने भरुन येतो. आता याच ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताला राज्यगीतचा दर्जा दिला जाणार आहेत. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत घोषणा केली आहे.
‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताला महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा दिला जाणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
अमृत मोहत्सवी वर्षा निम्मित प्रत्येक राज्याला एक गीत असावे असे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
या गाण्यातील दोन कडवी घेतली जाणार आहेत. हे गीत एक मिनिट किंवा दीड मिनिटाचे गीत करून हे राज्यगीत म्हणून घोषीत केले जाणार आहे.
महाराष्ट्र पुरस्कार कार्यक्रम आणि राज्य गीत याची घोषणा दिवाळी नंतर एक कार्यक्रमात केली जाणार आहे. सर्व शासकीय मोठया कार्यक्रमात हे गीत लावले जाणार आहे. हे गीत संपूर्ण महाराष्ट्राला नविन उत्साह देणार असल्याचा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र गौरव गीत अशी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताची ओळख आहे. सीमा आंदोलनाच्या काळात हे गाणं चांगलच लोकप्रिय झाले होते.
कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत शाहिर साबळे यांनी त्यांच्या खणखणीत आवाजानं अजरामर केले.