नाशिक : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर थेट राष्ट्रपती यांच्याकडे प्रस्ताव पाठविला जात आहे. पंतप्रधानांना पत्र लिहून राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी केली जात आहे. याच दरम्यान नाशिकमधील जाखोरी गावाने राज्यपाल यांना हटवा म्हणून ग्रामसभा बोलावून ठराव केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राज्यातील वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून ग्रामीण भागातही पडसाद उमटू लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला म्हणून नाशिक मधील जाखोरी गावाने बैठक घेऊन राज्यपाल हटवा म्हणून ठराव केला आहे. राज्यपाल हटवा म्हणून असा ठराव करणारे नाशिकच काय राज्यातील पहिले गाव असल्याचं बोललं जात आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त विधानावरुन राज्यभर आंदोलन आणि निदर्शने केली जात आहे.
सर्वच राजकीय पक्ष भगतसिंग कोश्यारी यांच्या मताशी सहमत नसून गडकरी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिकमधील जाखोरी गावाने मंगळवारी ग्रामसभा घेऊन राज्यपाल यांच्या विरोधात एकमुखाने ठराव केला असून पुढील प्रकिया लवकरच केली जाणार आहे.
राज्यपाल यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून ठिकठिकाणी जोडे मारो आंदोलन, निदर्शने केली जात आहे.
मात्र, नाशिक मधील जाखोरी येथील ग्रामस्थांनी राज्यपाल यांच्या विरोधात घेतलेली ही भूमिका चर्चेचा विषय ठरत असून राज्यातील इतर गावांनीही ठराव करून राष्ट्रपती महोदयांना पाठवावा असं आवाहनही करण्यात येत आहे.
सरपंच मंगला जगळे, उपसरपंच ज्योती पवार, सदस्य विश्वास कळमकर, राहुल धात्रक, तुकाराम चव्हाण, नितीन कळमकर, मधुकर पवार, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप कळमकर यांनी याबाबत पुढाकार घेतला होता.