किशोर पाटील, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, जळगाव : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याच सरकारला टोला लगावला आहे. महिलांसाठी आरक्षणाचा कायद्यावरून बावनकुळे यांनी आपल्याच सरकारला टोला लगावला आहे. सरकारने महिलांसाठी आरक्षणाचा कायदा केला. पण आमचं विधानसभा निवडणुकीत काय होणार? आमच्या जागी महिला असल्या तर काय होईल? हे माहित नाही. पण मामाने तर जुगाड लावला आहे. मामाच्या जागी मामी राहील, या शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार सुरेश भोळे यांना उद्देशून भाषणातून फटकेबाजी केली. चंद्रशेखर बावनकुळे जळगावमध्ये बोलत होते.
देशाला वाचविण्याची काम महिलांनी केलं. सावित्रीबाई फुले, झाशीची राणी ही उदाहरणं आमल्या समोर आहेत. हे डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या आरक्षणाचा कायदा संसदेत पास केला. आरक्षणाचा फायदा होणार असल्याने देशात 191 महिला खासदार तर 100 महिला आमदार होणार आहेत. 33 टक्के जे महिलांना आरक्षण मिळालं. त्यामुळेच हे शक्य आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, लोक तुमच्या सभांना गर्दी करतील. मात्र निवडणुकीच्या वेळी बटन हे कमळाच दाबतील, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
जळगवामध्ये असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. त्यांच्या निवासस्थानी मुक्ताईनगरमध्ये जात बावनकुळेंनी रक्षा खडसेंची भेट घेतली. त्यांच्यासोबत चहा नाश्ता घेतला. तर रावेर लोकसभेच्या जागेबाबत मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंच्या घरी बंद दरवाजाआड चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे.
एकनाथ खडसेसाहेब तुमच्यात धमक असेल तर इंडिया आघाडीतून बाहेर पडा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे जाहीर भाषणात एकनाथ खडसे यांना आव्हान दिलं होतं. मात्र याच आव्हानानंतर बावनकुळेंनी एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. बावनकुळे यांच्यासोबत खासदार रक्षा खडसे एकाच वाहनांमध्ये मुक्ताईनगरमधून रवाना झाले. त्यामुळे आगामी रावेर लोकसभेबाबत रक्षा खडसे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती समोर येत आहे.