जळगाव : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांना जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे समर्थक संजय पवार यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर एकनाथ खडसे यांचे समर्थक असलेल्या ॲड रवींद्र पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तर याच निवडणुकीत उपाध्यक्षपदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अमोल पाटील बिनविरोध निवडून आलेले आहे. इतकंच काय ठाकरे गटासह कॉंग्रेसनेही महाविकास आघाडीत बंडखोरी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दूर ठेवत इतर सर्वच पक्षांनी एकत्र येत जिल्हा बँक ताब्यात घेतली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या हातून जिल्हा बँकही गेल्याचं दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्हा सहकारी बँकेवर सत्ता असणं हे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात वर्चस्व असल्यासारखं असतं. त्यासाठी जिल्हा बँक आपल्या ताब्यात असावी असं अनेक बड्या नेत्यांना वाटत असतं. आणि तसा प्रयत्न देखील केला जातो.
नुकतीच जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. एकनाथ खडसे यांचेच एक मत फुटले असून कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानेही मतदान न केल्याने खडसे यांच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.
एकनाथ खडसे याचा समर्थक असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ॲड रवींद्र पाटील यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांना विचारून ही उमेदवारी जाहीर केल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी म्हंटलं होतं.
मात्र, अध्यक्षपदाबाबत अर्ज मागविले जात असतांना संजय पवार यांनी अर्ज दाखल करून बंडखोरी केली. संजय पवार हे अजित पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी एकनाथ खडसे यांनाच धक्का देऊन एकनाथ शिदे यांच्या शिवसेनेची मदत घेत, महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला सोबत घेत अध्यक्षपद मिळविले आहे.
दरम्यान, जळगावमध्ये एकनाथ खडसे यांच्या हातून जिल्हा बँकही गेल्याने एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये जसे स्थानिक पातळीवर अनेकदा विरोध पाहायला मिळत होता अगदी तसाच अनुभव एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येऊ लागल्याची चर्चा आहे.