जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात किनगावजवळ झालेल्या ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रावेर तालुक्यामधील आभोळा गावावर शोककळा पसरली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महार्गावर घडला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 15 मजुरांमध्ये सात पुरुष, सहा महिला आणि दोन बालकांचा समावेश आहे. (Jalgaon Truck accident kills family of ten)
पपई नेणारा ट्रक उलटला
रावेर तालुक्यातील अभोडा, केऱ्हाळा तसेच रावेर शहरातील काही मजूर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील गावांमधून पपई ट्रकमध्ये भरण्याच्या कामासाठी गेलेले होते. ट्रकमध्ये पपई भरल्यानंतर ते रात्री पुन्हा रावेरला परत येत होते. किनगावजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.
ट्रकखाली दबून मजुरांचा मृत्यू
अपघातात काही मजूर ट्रकखाली तर काही मजूर पपईखाली दबले गेले. यामध्ये 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने लवकर मदतकार्य मिळू शकले नाही. त्यामुळे अनेक जखमींचा मृत्यू झाला. या अपघातात ठार झालेल्या मजुरांमध्ये सर्वाधिक पुरुष मजुरांचा समावेश आहे. सात पुरुष तर सहा महिलांचा आणि दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकमध्ये एकूण 21 मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.
मृतांच्या वारसांना सरकारकडून मदत
घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात ठार झालेल्या मजुरांमध्ये रावेर तालुक्यातील अभोडा, केऱ्हाळा तसेच रावेर शहरातील मजुरांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
पंतप्रधान शोकाकुल
महाराष्ट्रातील जळगाव येथे हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात घडला आहे. शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशा शब्दात पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील जळगाव येथे हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात घडला आहे. शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो. – पंतप्रधान @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 15, 2021
संबंधित बातम्या :
जळगावात ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू, पंतप्रधान मोदी हेलावले, मराठीतून श्रद्धांजली
जळगाव अपघातातील 15 मृत मजुरांच्या नातेवाईकांना ठाकरे सरकारकडून दोन लाखांची मदत
(Jalgaon Truck accident kills family of ten)