जळगाव : देशाच्या नव्या संसदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. या नव्या संसदेचे उद्घाटन होत असताना विरोधकांनी मात्र उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. नूतन संसद भवनचे उद्घाटन होत असताना देशातील 19 राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. त्यावरूनच आता देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यावरुनच राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. जे विरोधी पक्ष उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्याविषयी बोलताना सत्ताधारी गटातील शिवसेनेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी लोकशाहीचे महत्व सांगत, आपल्या देशात लोकशाही नांदत असल्याने प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहेत.
त्यामुळे विरोधकांनी न येण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र तरीही उद्घाटनाचा कार्यक्रम थांबला नाही, तो मोठ्या उत्साहात पार पडलाच असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
संसद भवनच्या उद्घाटन कार्यक्रमाविषयी बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, विरोधकांनी त्यांची जी काही विरोधाची भूमिका असेल ती विरोधकांनी बजावली आहे. मात्र, संसद हे देशाचं सर्वोच्च सभागृह आहे.
त्यामुळे विरोधकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होते. शेवटी लोकशाही आहे त्याचा त्याला विचार करण्याचा अधिकार आहे. विरोधक जरी अनुपस्थित राहिले तरी उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलाच अशी प्रतिक्रिया राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात ते एका विवाह समारंभाला उपस्थित होते. दिल्लीत नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडले. या कार्यक्रमाकडे विरोधी पक्ष्याच्या नेतेमंडळींनी पाठ फिरवली आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधकांनी संसद भवनच्या उद्घाटनला न जाता,19 राजकीय पक्षांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. त्यामुळे भविष्यातही यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.