जळगाव : सध्या सोशल मीडियावर अंगावर शहारे आणणारे एका लहान चिमुकल्याचे भाषण तुफान व्हायरल होत आहे. या चिमुकल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेलं तीन मिनिटांचे भाषण नेटकऱ्यांना भुरळ घालत आहे. तो म्हणतो, अन्यायाची जाणीव करून दिल्याशिवायतो बंड करून उठणार नाही. म्हणून शिका, संघटित व्हा संघर्ष करा. हा तुमच्या आमच्या जीवनाचा मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला.
तुमच्या आमच्या सुखी, संपन्न जीवनासाठी बाबासाहेब यांनी अपार कष्ट केले. घाम गाळले. रक्ताचं पाणी केलं. झगडले, झुंजले. बाबासाहेब यांचा देह झिजला म्हणून तुमचा आमचा देह सजला, हे लक्षात ठेवा, असं हा चिमुकला सांगतो.
असे कितीतरी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री झाले नि गेले. पण, त्याहून एक नाव चिरंतन लक्षात राहिले, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. शेतकरी, कष्टकरी, कामगार, दीनदलीत यांना बाबासाहेब यांनी जागृत केलं. त्यांना स्वतःच्या हक्काची बुद्धीची, शक्तीची जाणीव करून दिली, याची जाणी या चिमुकल्यानं करून दिली.
रानारानातून, वनावनातून, डोंगरदऱ्यातून हातात झेंडे घेऊन हा समाज बाहेर पडला. कुणी इंजिनीअर झाले. कुणी वकील झाले. कुणी डॉक्टर झाले. कुणी कलेक्टर झालं. म्हणूनचं सर्कसीत बंदुकीच्या जोरावर वाघाला शिकवणारी माणसं मी पाहिली. पण, बंदुकीशिवाय जगाला शिकवणारा एक वाघ मी पाहिला तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर.
बाबासाहेब यांचे कार्य, कर्तृत्व, मातृत्व हे हिमालयाच्या उंचीचे आहे. सह्यांद्री येवढं बुलंद, बलाढ्य आहे. त्यांची झुंड, त्यांचा लढा मोठा आहे. सरकारी कार्यालयात ज्यांची फोटो असते असे एकच विश्वरत्न होऊन गेले ते म्हणजे बाबासाहेब.
बाबासाहेब तुम्ही नवसाला पावणारे देव नव्हे. कुठल्याही गल्लीतील राजा नव्हे. तुम्ही काही जागृत देवस्थान नव्हे. एप्रिल महिन्यात जागृती होते. स्वातंत्र्य, समता याचा हक्क काय आहे. असं हा चिमुकला सहज बोलतोय.