जळगावात सर्वात मोठा ट्विस्ट, खुद्द रक्षा खडसे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला

| Updated on: May 10, 2024 | 4:05 PM

जळगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय. कारण एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला खुद्द खासदार रक्षा खडसे या गेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी आपला प्रचार कारावा या हेतून रक्षा खडसे चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला गेल्या आहेत.

जळगावात सर्वात मोठा ट्विस्ट, खुद्द रक्षा खडसे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला
जळगावात सर्वात मोठा ट्विस्ट, खुद्द रक्षा खडसे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला
Follow us on

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार रक्षा खडसे यांनी आमदार एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक असलेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरी जावून भेट घेतली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चंद्रकांत पाटील हे नाराज असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. चंद्रकांत पाटील यांचा रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध होता. पाटील यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडेही बोलून दाखवल्याची माहिती समोर आली होती. यानंतर चंद्रकांत पाटील यांची समजूत काढण्याचे प्रचंड प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आले आहेत. नुकतंच शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यातील बडे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलबाराव पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आता स्वत: रक्षा खडसे चंद्रकांत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या भेटीसाठी गेल्या आहेत.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघावर अनेक वर्ष एकनाथ खडसे यांची एकहाती सत्ता राहिलेली होती. पण त्यांच्या या वर्चस्वाला धक्का देणारी घटना 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर बघायला मिळाली. कारण एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा या मतदारसंघात पराभव झाला. अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा या मतदारसंघात विजय झाला होता. चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे हे मुक्ताईनगरमध्ये परस्परांचे कट्टर विरोधक आहेत. सध्याच्या घडीला चंद्रकांत पाटील यांचे शिवसेना पक्षासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कदाचित त्यांना शिवसेनेकडून उमेदवारीचं तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे.

दिग्गजांकडून चंद्रकांत पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न

चंद्रकांत पाटील यांची मुक्ताईनगर शहरात चांगली ताकद आहे. त्यामुळे त्यांनी युती धर्म पाळावा, अशी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून चंद्रकांत पाटील हे नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका हॉटेलमध्ये बैठक झाल्याची देखील माहिती समोर आली होती. चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार करावा यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गुलाबराव पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली होती.

विशेष म्हणजे इतक्या दिग्गज नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता स्वत: रक्षा खडसे या चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. चंद्रकांत पाटील रक्षा खडसे यांच्या विनंतीचा मान ठेवून शहरात प्रचारासाठी सक्रिया होतात का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.