जळगावः महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांच्या कृत्यामुळे राज्यातील जनतेची झोप उडाली आहे, असा दावा रविवारी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते जळगावमध्ये आले असता बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना त्यांनी काही पथ्ये पाळावीत म्हणून सबुरीचा सल्ला दिला. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र राज्यात रंगले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. भाजपकडून किरीट सोमय्या रोज एक मंत्री आणि नेत्यावर आरोप करतायत. सोमय्यांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून स्वतः खासदार संजय राऊत मैदानात उतरलेत. त्यांनी थेट शिवसेना भवनातून पत्रकार परिषद घेत आरोपांची राळ उडवून दिली. त्यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही जोरदार आरोप केले होते. या साऱ्याला आज चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले. आता याला आज कोण उत्तर देणार, याची उत्सुकता आहे.
काय म्हणाले पाटील?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमच्यामुळे जनतेचे मनोरंजन होत नाहीये, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कृत्यामुळेच जनतेची झोप उडाली आहे. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये महाविकास आघाडी सरकारचे अनेक मंत्री अडकले आहेत, अडकत आहेत, अशा जोरदार शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. पाटील जळगावमध्ये गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी भाजपचे माजी नेते आणि सध्या ‘राष्ट्रवादी’मय झालेले खडसे यांनाही चिमटे काढले.
खडसेंना काय दिला सल्ला?
चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले असले, तरी त्यांच्याबद्दल आजही आमच्या मनात आदर आहे. भाजपमध्ये असताना जे मिळत होतं, त्यावर समाधान मानून खडसेंनी पदरात पाडून घ्यायला होतं. पक्षाचे नुकसान न करता पुढे जायला हवे होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. ते जरी आमच्यावर आरोप – प्रत्यारोप, टीका-टिपण्णी करत असतील, तर आम्ही मात्र तसे करणार आहे. त्यांनी पथ्ये पाळली पाहिजेत. बाकी ते जेष्ठ नेते आहेत. योग्य काय ते ठरवतील.