जळगाव : जळगाव जिल्ह्यातील आमदार चिमणराव पाटील व मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद फक्त जिल्ह्यालाच माहिती आहे असं नाही. तर त्यांचा हा वाद आता राज्यभर चर्चेला गेला होता. पक्षात जेष्ठ असूनही मंत्रीपदाची संधी दिली नसल्यामुळे आमदार चिमणराव पाटील नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी व्यासपीठावरून राष्ट्रवादीचे जाहीर कौतूक केले होते. त्यामुळे त्यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी अटकळही बांधण्यात आली होती. त्यानंतर आता चिमणराव पाटील यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्यांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील शांत व सयंमी राजकीय नेतृत्व म्हणून पारोळा-एरंडोल मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील (आबा) यांची ओळख.
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यात चिमणरावांचा मोठा वाटा आहे. ते तिसर्यांदा शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.
1999 च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेतर्फे चिमणआबा पाटील पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2004 मध्ये चिमणआबा पाटील यांचा पराभव झाला होता, तर 2009 च्या निवडणुकीत चिमणआबा पाटील पुन्हा निवडून आले होते, तर त्यानंतर 2014 मध्ये चिमणआबा पाटील पराभूत झाले आणि त्यानंतर 2019 मध्ये चिमणआबा पुन्हा निवडून आले.
आबा 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते तरीही त्याआधीपासून ते राजकारणात सक्रिय होते. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात जनता पार्टीपासून झाली होती.
त्यानंतर 1978 मध्ये त्यांनी पहिल्यांदा जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थात जेडीसीसीच्या माध्यतातून आपल्या राजकारणाचा श्रीगणेश: केला. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील तत्कालिन दिग्गज नेते भास्कर आप्पा पाटील यांना पराभूत केले होते. भास्कर आप्पांना पराभूत करणारा हा तरुण कोण? याची जास्त चर्चा झाली होती.
त्यानंतर आबा सातत्याने जेडीसीसीला निवडून येत राहिले. 1980 मार्केट कमिटी, 1986 भू विकास बँक, 1991-92 राहूरी कृषी विद्यापीठावर असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
राजकीय जीवनात दीर्घ अनुभव असतानाही पक्षाकडून त्यांना मंत्रीपदाची एकदाही संधी दिली नाही. तर महाविकास आघाडीचे सरकार असतानाही त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे ते नाराज होते.
राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सर्वात प्रथम आमदार चिमणराव पाटील त्यांच्या सोबत होते. बंडखोरीत सुरत येथे त्यांचा समावेश होता, त्यानंतर गुवाहाटी येथे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिंदे गटाच्या बंडखोरीचे समर्थन करणारी भूमिका विशद केली होती. त्याचबरोबर बंडखोरांमध्ये ते सर्वात ज्येष्ठ आमदार असल्याने एकनाथ शिंदे त्यांना मंत्रिपदाची संधी देतील, अशी अपेक्षा होती. मात्र तेथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. पक्षात त्यांना योग्य तो सन्मान मिळाला नाही, अशी खंत त्यांचे समर्थक वेळोवेळी बोलून दाखवत आले आहेत.