जळगाव : जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी खड्ड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती पाहायला मिळते नुकतीच काही भागांमध्ये रस्त्यांचे रूपडे पालटले मात्र अद्यापही अनेक भागांमध्ये रस्त्यांची स्थिती जैसे थेच आहे. तीन ते चार सेवक बदलले मात्र तरीही रस्तेच काय पण मूलभूत सुविधाही मिळत नसल्याने नागरिकांनी आज भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या भाजपच्या आमदारांवर तीव्र संताप व्यक्त केला. तसेच नगरसेवकांनाही खडे बोल सुनावले. जळगाव आतील ढाकेवाडी पंचमुखी हनुमान मंदिर परिसरासह विविध ठिकाणच्या कामांचा आज भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्याहस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.
या सोहळ्याला उपस्थित ढाकेवाडी परिसरातील नागरिकांनी त्यांच्या परिसरात गेल्या 4 वर्षांपासून रस्ते गटारी तसेच पथदिव्यांची समस्या कायम असल्याने व कोणताही नगरसेवक ढाकेवाडी परिसरात फिरायला तयार नसल्याने आमदारांसमोर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
चार ते पाच नगरसेवक या वार्डात बदलले मात्र तरीही कोणीही या ढाकेवाडीतील समस्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे कर भरूनही जर सुविधा मिळत नसतील तर आगामी काळात महापालिकेच्या निवडणुकीत जो काम करेल त्याच नगरसेवकाला मतदान करू अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशाराच नागरिकांनी आमदारांना दिला आहे. यावेळी नागरिकांनी लोकप्रतिनिधींवर संतापही व्यक्त केला आहे.
ढाकेवाडीतील नागरिकांच्या संतप्त भावना त्यांनी व्यक्त करताना आमदार सुरेश भोळे यांनीही मौन धारण केले होते. मंत्र्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून दिला आहे, मात्र महापालिका प्रशासनाकडून जर काम केली जात नसतील तर काय करावे, असं म्हणत आमदार सुरेश भोळे यांनी नगरसेवकांवरील घोंगडे महापालिकेवर झटकले आहे.
त्यामुळे आता या गोष्टीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. लवकरात लवकर या परिसरातील कामही होतील असंही थातूरमातूर आश्वासन देत आमदार सुरेश भोळे यांनी वेळ मारून नेल्याच पाहायला मिळाला.
दरम्यान आमदारांनी केलेल्या विकास कामांच्या भूमिपूजनापेक्षा या ठिकाणी ढाकेवाडीतील रहिवाशांनी आमदारांवर व्यक्त केलेला संतापाची जोरदार चर्चा रंगली आहे.