जळगावः शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेल्या पांढऱ्या सोन्याला आता कवडीमोलाचाही भाव नसल्यामुळे बळीराजाने पिकवलेला कापूस आता घरामध्ये साठवून ठेवण्याक आला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कापसाला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील कापूस घरामध्ये साठवून ठेवला आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून हा कापूस घरात ठेवल्याने आता त्याला किडीचा प्रादूर्भाव लागला आहे. त्याचा शेतकऱ्यांना आणि लहान मुलांनाही त्रास होऊ लागला आहे.
घरात ठेवलेल्या कापसामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी आता सरकारलाच कापसाला चांगला भाव देण्याची मागणी केली आहे.
सध्या शेतीचे अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. कांदा, गहू, हरभरा, मूग अशा आणि इतर पिकांनाही बाजारभावाचा जोरदार फटका बसला आहे.
जळगाव जिल्ह्यातील कापूस शेतकऱ्यांनी पिकवला खरा मात्र त्या कापसाला योग्य बाजारभाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता मायबाप सरकारकडे योग्य बाजारभाव देण्याची मागणी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा कापूस बाजारभाव नसल्याने आता घरात पडून आहे.
त्यामुळे आता शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. घरात कापूस ठेवल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरातील माणसांच्या आरोग्याच्या समस्यांनी आता डोके वर काढले आहे. तर दुसरीकडे बाजारभाव मिळाला नसल्यामुळे आणि कापूस विकला गेला नसल्यामुळे त्यांच्या आर्थिक संकट ओढावले आहे.
त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या तरी आता रुग्णालयात जाण्यासाठीसुद्धा आमच्याकडे पैसा नाही अशी अवस्था कापूस उत्पादकांची झाली आहे.
मागील गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कधी बाजारभावाच्या चक्रव्यूहमध्ये अडकला आहे तर कधी अवकळी पावसाच्या फेऱ्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आताही शेतकऱ्यांची तिच अवस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आता मदत तरी कुणाकडे मागायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.