जळगाव | 19 ऑगस्ट 2023 : जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक ईश्वरलाल जैन यांच्यावरील ईडी धाड प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ईडीने या प्रकरणात 24 कोटी 7 लाखांचे दागिने आणि 1 कोटी 11 लाखांची रक्कम जप्त केली आहे. ईडीने मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि जळगावमध्ये धाडी टाकल्या होत्या. जैन यांच्या 50 कोटींच्या 60 मालमत्तांची कागदपत्रेसुद्धा ईडीने आपल्या हाती घेतले आहेत. ईडीकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.
ईडीने गेल्या काही महिन्यांपासून आतापर्यंत केलेल्या कारवाईत जितकी मालमत्ता जप्त केली नव्हती तितकी मालमत्ता जळगाव राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या मालकांवर केलेल्या धाडीतूनल जप्त केली आहे. ईश्वरलाल जैन यांच्याशी संबंधित 13 ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्याममध्ये 39 किलो सोन्याचे दागिने, हिरे जप्त करण्यात आले. याची किंमत 24 कोटी 7 लाख रुपये इतकी होती.
ईडीकडून या कारवाईत 1 कोटी 11 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय 60 मालमत्तांची कागदपत्रे सापडली आहेत, ज्यांची किंमत 50 कोटी इतकी आहे. याशिवाय जैन यांच्या नावे जळगाव आणि जामनेरमध्ये दोन बेनामी मालमत्ता सापडल्या आहेत. त्यामुळे ईडी याप्रकरणी सविस्तर तपास करत आहे.
विशेष म्हणजे ईडीच्या 60 अधिकाऱ्यांकडून ही धाडसत्राची मोहिम राबवण्यात आली. ईडी अधिकाऱ्यांची ही कारवाई सलग 40 तास सुरु होती. ईडी अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी छापा टाकला. या छाप्यांमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळाली. ईडीने सर्व कागदपत्रे जप्त केली आहेत. दरम्यान, माजी आमदार मनिष जैन यांनी या कारवाईनंतर आपण अजून हार मानलेली नाही. त्यामुळे पुढच्या सर्व कायदेशीर गोष्टींना सामोरं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
ईश्वरलाल जैन यांनीसुद्धा ईडीच्या या कारवाईवर आक्षेप घेतलाय. त्यांनी ईडी ज्या पद्धतीने कारवाई करत आहे ते चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी एसबीआय बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाचा विषय माध्यमांना सांगितला होता. त्यातून हे सगळं घडत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.