जळगाव : महाराष्ट्रात सध्या किळसवाणे राजकारण सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. एकमेकांवर टीका करणारे हातात हात घालून उभे आहेत, असं खडसे यांनी म्हंटलं. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. एकनाथ खडसे म्हणाले, अलीकडच्या काळात राज्यात राजकारण सुरू आहे. हा प्रकार अत्यंत किळसवाणा आहे. मागच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेसशी युती नाही. नाही, नाही नाही.
अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विधानसभेत आणि विधानसभेबाहेर शब्द वापरले ते विषारी टीका करणारे होते. या तिन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेले आरोप हे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. एकमेकांविरोधातील संताप लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय.
सोशल मीडियावर याबाबत अतिशय घाणेरडे मिम्स येत आहेत. अविवाहित राहू पण राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणार नाही, असं ठासून सांगणारे राष्ट्रवादी सोबत सत्तेत बसले. असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. बऱ्याचदा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधानसभा सभागृहात आणि बाहेरही विषारी टीका केली होती.,
एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केलं होतं. आता तेच सत्तेत हातात हात घालून एकत्र आले आहेत. हे राज्यातील जनतेला काही पटलेलं नाही. याविषयी सोशल मीडियावर जनतेत एक संतापाची लाट पसरली आहे. अशा परिस्थितीत जनतेला आता राज्यात महाविकास आघाडी हाच पर्याय पर्याय दिसत आहे असेही खडसे म्हणाले.