अनिल केऱ्हाळे, TV9 मराठी, प्रतिनिधी, जळगाव : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना खोचक टोला लगावला आहे. खडसे म्हणाले, मी भाजपमध्ये असताना टीव्हीमध्ये दिसण्यासाठी गिरीश महाजन माझ्या मागे उभे राहायचे. आता गिरीश महाजन टीव्हीवर दिसण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस व इतर मंत्री यांच्या मागे उभे राहतात.
सुरक्षेच्या मुद्द्यावरून देखील एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना खोचक टोला लगावला. गिरीश महाजन यांचे अनेकांशी चांगले संबंध आहेत. त्यांना रात्री बेरात्री अनेक जण भेटायला येतात. ते त्यांना एकांतात भेटतात. त्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात. म्हणून कदाचित महाजन यांनी सुरक्षा नाकारली असेल, असा खोचक टोला एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना लगावला.
एकनाथ खडसे म्हणाले, 1993 ला बाँम्बस्फोट झाले. सीमीविरोधात मी आंदोलन केले. नंतरच्या कालखंडात 26-11 ची घटना घडली. त्यावेळी अनेक अंडरवर्ल्डमधल्या लोकांची मी नाव घेत होतो. त्यावेळी मला दुबई, युईमधून फोन येत होते.
पोलिसांनी ते व्हेरिफाय केले. त्यामुळं 1993 पासून आजपर्यंत मला सुरक्षा व्यवस्था पुरविली होती. सरकारच्या विरोधी भूमिका घेतल्यामुळं माझं सुरक्षा कवच रात्री काढून घेतलं आहे. रात्री तीन वाजता बैठक होते. त्यात असा निर्णय घेतला जातो.
गिरीश महाजन म्हणतात की, नाथाभाऊंना आता सुरक्षेची काही आवश्यकता नाही. नाथाभाऊ सुस्वभावी आहेत. याचा अर्थ गिरीश महाजन गुंड आहेत. किंवा त्या प्रवृत्तीचे लोकं त्यांच्या सोबत आहेत.
गिरीश भाऊ म्हणाले की, मी माझी सुरक्षा कमी करून टाकली. गिरीश भाऊंना सुरक्षेचं कडं असलं तर ते त्यांना अडचणीचं ठरतं.