जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदान झालं. भाजप नेते गिरीश महाजन, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांचे भवितव्य मतपेटीत सील बंद झालं आहे. उद्या मतमोजणी होणार असून जळगाव जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात कोणाची सद्दी आहे हे स्पष्ट होणार आहे.
दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या सहकार पॅनलविरुद्ध गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांचं शेतकरी पॅनल रिंगणात होतं. मतदानानंतर आता उद्याच्या निकालात नेमकं कोणतं पॅनल बाजी मारतं याची उत्सुकता राज्याला आहे.
ही निवडणूक जाहीर झाल्यापासून एकनाथ खडसे गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. विशेष करून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं.
एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर पहिल्यांदाच खडसे आणि महाजन यांच्या थेट निवडणुकीचा सामना होतोय. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व होतं. दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती. त्यामुळे त्यांनी यात विशेष रस घेतल्याचं पाहायला मिळालं.
एकनाथ खडसे यांना शह देण्यासाठी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील हे दोन्ही नेते एकत्र आले. दूध संघात खडसेंनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करत दोघेही खडसेंवर अक्षरश: तुटून पडले. दूध संघ वाचण्यासाठीच आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलोय. आमचं पॅनल विजयी होईल असा दावा त्यांनी केलाय.
या निवडणुकीत अनेक ठिकाणी हाय व्होल्टेज लढती रंगल्या. त्यात मुक्ताईनगरात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी उमेदवारी केलीय. दुसरीकडे जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या सासुबाई मालती महाजन यांनी आव्हान दिलंय. आता नेमकं कोण बाजी मारतं याचीही उत्सुकता आहे.