जळगाव : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने फक्त शिवसेनाच नाही तर महाराष्ट्राला हादरवून सोडलं. एक महिन्याआधी पहाडासारखं मजबूत दिसणार ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळेच कोसळला यात शिवसेनेचे आमदारांकडून (Shivsena MLA) दोन प्रमुख कारणे देण्यात आली. एक म्हणजे पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे यांची भेटच होत नसल्याचा सूर आमदारांनी लावला. दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती तशीच काही आहे. मागे एकदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे राहुल गांधी यांची भेटीसाठी वेळच मिळत नसल्याचे म्हणाले होते. त्यानंतर आता भाजपने ते गिरीश महाजन यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बाबत एक मोठा वक्तव्य केलं आहे. गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेसारखं बंड काँग्रेसमध्येही होणार का? असा सवाल उपस्थित होतोय.
आता सरकार बदलल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केलाय. तसेच त्या नेत्यांची नावे सांगण्यासही त्यांनी नकार दिला आहे. महाविकास आघाडीचा सरकार हे अपघाताने आलं होतं. लोकांना असं वाटतं इकडे राहून काय उपयोग नाही. महाविकास आघाडीत सेनेची नैसर्गिक युती नव्हती. आम्ही सेना-भाजप एकत्र लढलो होतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व विकासाच्या दृष्टीने एक नंबर आहे. त्यामुळे अनेकांना आता भाजप शिवाय दुसरा पर्याय नाही. असे वाटत आहे. त्यामुळेच हे नेते आमच्या संपर्कात आले आहेत, असा दावा भाजपचे गिरीश महाजन यांनी केला आहे.
तसेच काँग्रेसमध्ये सर्व काही अलबेल सुरू नाही, असा दावाही महाजन यांच्याकडून केला गेला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कोणालाही विचारत नाहीत, खाली काय सुरू आहे? हे तपासून पहात नाहीत. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी. हे कोणाला भेटायला वेळ देत आहेत का? त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्व अलबेल सुरू आहे, असं म्हणणं चुकीचं ठरेल असंही महाजन म्हणाले आहेत. त्यामुळे अनेकांना वाटतं की आपण कुठेतरी सुरक्षित स्थळी गेलं पाहिजे. जिथे आपल्या राजकीय कारकीर्दीला न्याय मिळेल आणि याचमुळे नेत्यांची खदखद बाहेर येत आहे, असेही गिरीश महाजन म्हणाले आहेत. त्यामुळे आता हा दुसऱ्या एका मोठ्या बंडाचे संकेत आहेत का? असाही सवाल उपस्थित होऊ लागला आहे. गिरीश महाजन यांचा हा दावा किती खरा आणि किती खोटा? हे येणारे काही दिवसच सांगतील.