उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गुलाबी जॅकेट घालून असतात. जनसन्मान यात्रेतही ते गुलाबी जॅकेटमध्ये दिसतात. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. काही काही लोकांना रंग हा लकी असतो. त्यातल्या त्यात गुलाबी…. आणि माझ्या नावात सुद्धा गुलाब आहे. शेवटी हा ज्याचा त्याचा विषय आहे. मी काही ज्योतिषी नाही. आपल्याकडे आता जिह्यात मुख्यमंत्री येणार आहेत. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय की प्रत्येकाने गुलाबी शर्ट घालावा… पण हा विनोदाचा भाग आहे, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांच्या गुलाबी यात्रेवर टोला लगावला आहे.
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मी सीनियर आहे. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी आमदार सोबत आणल्याने त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं त्याचप्रमाणे मुख्यमंत्री केला असता तर मी संपूर्ण पक्ष आणला असता अस वक्तव्य केलं होतं. अजित पवार यांच्या याच वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर देत अजित पवार यांना जोरदार टोला लगावला आहे. आम्ही अजितदादा पवार यांचा आदर करतो. पाच वेळा ते राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. सकाळी सकाळी सुद्धा ते उपमुख्यमंत्री झाले आहेत, असं गुलाबराव पाटील यांनी अजितदादांना टोला लगावला आहे.
पुण्यातील जागेच्या याचिकेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारचे कान उघाडणी केली आहे. लाडकी बहीण योजनेत द्यायला पैसे आहेत आणि जमिनीचा मोबदला द्यायला सरकारकडे पैसे नाहीत का? असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. त्यावर गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलं आहे. सुप्रीम कोर्टाने काय निर्देश द्यावे हा त्यांचा विषय आहे. मात्र त्याकरता योजना थांबवणे हे कुठल्याच कायद्यात बसत नाही. त्यामुळे सरकार आहे. सरकार निश्चितच त्या विषयावर सुद्धा काहीतरी मार्ग काढेल. त्यामुळे सरकार सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश सुद्धा पाडेल आणि लाडक्या बहिणींना सुद्धा खुश करेल, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
काहीच महिलांच्या खात्यामध्ये तपासणीसाठी एक रुपया टाकण्यात आला होता. सर्व महिलांच्या खात्यात पाठवले नव्हते. शंभर टक्के महिलांच्या खात्यावर एक रुपया टाकण्यात आलेला नाही, असंही ते म्हणाले.