Gulabrao Patil : फेसबुकवर काही पाहिलं की गर्रकन बीपी, शुगर वाढतो; गुलाबराव पाटील यांच्या गावरान तडक्याने हास्याची उकळी, शिक्षक सत्कार कार्यक्रमात तुफान बॅटिंग

| Updated on: Sep 01, 2024 | 3:15 PM

शिंदे मंत्रिमंडळातील मुलूख मैदान तोफ म्हणजे गुलाबराव पाटील. बिनधास्त आणि अचूक शब्दात समोरच्यापर्यंत म्हणणं पोहचवण्याचे त्यांचे कसब निराळंच आहे. शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांनी जीवन पट उलगडताना तुफान बॅटिंग केली. गुलाबराव टायमिंग साधण्यात चुकत नाहीत, हे वेगळं सांगायला नको.

Gulabrao Patil : फेसबुकवर काही पाहिलं की गर्रकन बीपी, शुगर वाढतो; गुलाबराव पाटील यांच्या गावरान तडक्याने हास्याची उकळी, शिक्षक सत्कार कार्यक्रमात तुफान बॅटिंग
गुलाबराव पाटील यांची तुफान बॅटिंग
Follow us on

शिंदे मंत्रिमंडळातील खानदेशमधील मुलूख मैदान तोफ म्हणजे गुलाबराव पाटील. अनुभवाच्या शाळेत परिपक्व झालेल्या गुलाबराव पाटील यांनी शिक्षक सत्काराच्या निमित्ताने जीवनपट उलगडला. पण त्याचवेळी अचूक राजकीय टायमिंग कसं साधलं, याचे किस्से पण सांगितले. यावेळी त्यांनी तुफान बॅटिंग केली. तसे गुलाबराव पाटील टायमिंग साधण्यात चुकत नाहीत, हे वेगळं सांगण्याची गरज आहे का? मुद्दा आणि विरोधक दृष्टीच्या टप्प्यात आला की त्यांनी टोलावलाच म्हणून समजा.

मी राजकारणाच्या शाळेत शिरलो

कुणी जर चांगलं काम करत असेल तर चांगल्याला चांगलं म्हटल पाहिजे. कुणी चांगलं काम करतो आहे तर त्याच्यावर टीका करून पोट भरायचं हे काम आपल्याला कधी जमलं नाही.. आम्ही सगळं काम कृतीत करतो, असे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. शिक्षण घेण्याची हे आमचे परिस्थिती नव्हती त्या काळात मात्र आम्हाला गुरुजनांनी मोठे केलं. शाळेत मी फार काही हुशार नव्हतो. माझा डीएडला नंबर लागला होता.. मला ५६ टक्के मार्क पडले होते,  ते पण विदाऊट कॉपी.

हे सुद्धा वाचा

मी पण गुरुजी राहिलो असतो गुलाब गुरुजी. पण मी काही डीएड ला गेलो नाही बाबा. माझ्याबरोबरचे सर्व शिक्षक मित्र मैत्रिणी आज शिक्षक झाले.. त्यांना चांगला पगार मिळतोय. मी पण मस्त राहिलो असतो. मात्र मी तिकडच्या गुरुजीच्या शाळेतून बाहेर पडलो आणि राजकारणाच्या शाळेत घुसलो, असे ते म्हणाले.

आता तर राजकारणचं भलं मोठं दुकान

माणूस ज्याही क्षेत्रामध्ये जात असेल त्या क्षेत्रामध्ये त्याने आपला ठसा उमतायला पाहिजे. मी गरिबी पाहिलेला माणूस आहे त्यामुळे आपला हृदय हलतं. नाटकांमध्येही मी चांगलं काम करायचं, गाणं म्हणणं, नाट्य छटा सादर करणे. हा माझा छंद होता. एका सिरीयल मध्ये सुद्धा मी काम केलं त्यावेळी मात्र त्यावेळी पाहिजे तशा सर्व गोष्टी नव्हत्या. त्या नाटकातून निघालो आणि ह्या राजकारणाच्या नाटकात आलो. इथं तर राजकारणाची भलेभले मोठे दुकान आहे, असा टोला त्यांनी लगावला.

लोकांना वाटतं पुढार्‍यांची खूप मजा आहे मात्र आम्हाला वाटतं गुरुजींची खूप मजा आहे. जो तो त्याच्या त्याच्या जागेवर बरोबर आहे जो काम करतो त्याचा सन्मान केला पाहिजे. त्यासाठीचा शिक्षकांचा सन्मान सोहळा आहे यात कुठलेही राजकारण नाही तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मतदान करा, असे ते म्हणाले.

फेसबुक पाहिलं की बीपी वाढतो

मोबाईल खूप वेगळी गोष्ट झाली आहे. सध्या मी फेसबुक वगैरे काहीच पाहत नाही कारण मला बीपी शुगर आहे. पाहिलं की गर्रदिशी बीपी वाढते, बीपी वाढली की शुगर वाढते, असे म्हणताच उपस्थितीतांमध्ये एकच खसखस पिकली. मी कधीच टेन्शन घेत नाही खस्ता खात खात आम्ही मोठे झालो आहे. ज्या काळात कोणी कोणते काम करू शकत नव्हतं असे काम आम्ही त्या काळात केले आहे, अशी आठवण त्यांनी काढली.

जेल तर आपलं कॉलिफिकेशन

जेल तर आपलं कॉलिफिकेशन होतं आहे, आंदोलनामध्ये जर कार्यकर्ता जेलमध्ये गेला नाही तर तो कार्यकर्ताच होऊ शकत नाही. जनतेच्या लढ्या करता..तर राजकारणी जेलमध्ये गेला असेल तरी त्याची पदवी आहे. बॅचलर ऑफ जेल ही आपली पदवी आहे, असे ते म्हणाले.

पहिले गावांमध्ये एकच शाळा असायची एकच हायस्कूल असायची आता माझ्याच एकट्या गावांमध्ये पाच इंग्लिश मीडियमच्या शाळा आहेत. शाळेतले शिक्षक शिक्षकांना टाय लावून शिक्षक येतात.. पूर्वी आमचे गुरुजी कशी असायची पांढरा धोतर पांढरी टोपी, पांढरे शर्ट हातात काडी आणि थैली. आता तर गुरुजी कुठून आलाय लक्षात नाही..मूळ सगळं बदलला आहे आणि काळाप्रमाणे बदललं पाहिजे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळा पार पडला. या शिक्षक सन्मान सोहळ्यामध्ये भाषणात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.