जळगाव / 23 ऑगस्ट 2023 : राज्यात अपघातसत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. कधी रस्त्यावरील खड्डे जीव घेतात, तर कधी वाहनचालकांच्या चुकीमुळे नगारिकांना जीव गमवावा लागतो. अशीच एक घटना जळगावमध्ये उघडकीस आली आहे. सहकार विभागाच्या बैठकीसाठी चाललेल्या विकास सोसायटीच्या सचिवाला गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने चिरडले. यात सचिवांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पंजाबराव बोरसे असे मयत सचिवांचे नाव आहे. बोरसे यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बेदरकार वाहने चालवत वाहतूक नियमांचं उल्लंघन होत असल्याचे समोर आलं आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आज सहकार विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीसाठी विकास सोसायटीचे पंजाबराव बोरसे हे सकाळी बोदवड येथून दुचाकीने जळगावला यायला निघाले. ते शहरातील आकाशवाणी चौकात पोहचले असता मागून गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडक बसल्याने बोरसे ट्रकच्या चाकाखाली आले आणि त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन ते जागीच गतप्राण झाले.
रस्त्यावर मोठा आवाज आल्याने नागरिकांनी धाव घेत पाहिले तर हा दुर्दैवी प्रकार घडला होता. नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्तळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठवला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातवेाईकांनी एकच आक्रोश केला होता. घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.