देशातील सुवर्णपेठ जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने कमाल दरवाढ नोंदवली. सध्या जागतिक आणि देशातही मौल्यवान धातूंनी कहर केला आहे. ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या दरवाढीमुळे सराफा बाजारात खरेदीसाठी गेलेला ग्राहक हिरमसून बाहेर पडत आहे. काही जण तर किंमती ऐकूनच खरेदीचा बेत रद्द करत आहे. तर लग्नसराईत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना नाईलाजाने मौल्यवान धातूची खरेदी करावी लागत आहे. गेल्या ९ मार्च रोजी जळगावच्या सराफा बाजारात जीएसटीसह सोन्याचे दर ६७ हजार ५०० रुपयांवर पोहचले होते. आता त्यात चार हजार रुपयांची दरवाढ झाली आहे.
सोने ७१ हजारांच्या घरात
देशातील सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने 70 हजारांचा आकडा पार केला. ‘जीएसटी’ सह सोन्याचे दर प्रतितोळा ७१ हजार ४८२ रुपयांवर पोहचला आहे. यापूर्वी ९ मार्च रोजी सोने ६५ हजार ७०० रुपये प्रतितोळा झाले होते. तर जीएसटीसह सोन्याचे दर ६७ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला होता. गेल्या अनेक दिवसांपासून सोने ६२ ते ६३ हजारांदरम्यान होते. पण आता सोन्याने मोठी झेप घेतली आहे.
चांदी पण सूसाट
जळगाव येथील सराफा बाजारात चांदीच्या दरात पण मोठी वाढ झाली आहे चांदीचे दर ८० हजार ३४० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. ६ मार्च रोजी ७२ हजार ८०० रुपये असलेल्या चांदीच्या दारातही दोनच दिवसात १२०० रुपये वाढ झाली. चांदीचे दर ७४ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. ५ ते २९ मार्चदरम्यान २४ दिवसांत सोन्याच्या दरात ६ हजारांची, तर चांदीच्या दरात ३ हजारांची वाढ नोंदविण्यात आली आहे. लग्नसराई, लोकसभा निवडणुकीमुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने मुसंडी मारली.24 कॅरेट सोने 69,364 रुपये, 23 कॅरेट 69,086 रुपये, 22 कॅरेट सोने 63,537 रुपये झाले.18 कॅरेट 52,023 रुपये, 14 कॅरेट सोने 40,578 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 77,594 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.