जळगाव : एका भीषण अपघातात जीवलग मित्रांचा एकाच वेळी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनं अख्खं जळगाव हळहळलं आहे. जळगाव पाचोरा रस्त्यावर भरधाव कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघे युवक जागीच ठार झाले. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. रफिक आणि अरबाज अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. हा अपघात इतका भीषण होता की दोघाही जीवलग मित्रांचा जागीच जीव गेला. शिवाय कार आणि दुचाकीचंही मोठं नुकसान झालं.
अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीवरील एका तरुणाचं नाव रफिक हुसेन मेवाती असं असून तो 23 वर्षांचा होता. तर दुसऱ्या तरुणाचं नाव अरबाज जहांगीर मेवाती असं असून तो 20 वर्षांचा होता. हे दोघेही तरुण राणी बांबरुड, तालुका पाचोरा या गावचे रहिवासी होते.
दोघे तरुण पेरू विक्रीचा व्यवसाय करतात, सोमवारी दिवसभर पेरूची विक्री करून सायंकाळी साडेसहा वाजता दुचाकी (एमएच 19 सीएच 4359) रफिक मेवाती हा त्याचा मित्र अरबाज जहांगीर मेवाती (वय-२१) याच्यासोबत राणीचे बांबरुड येथे घरी जाण्यासाठी निघाले होते.
शिरसोली गावाच्या पुढे असलेल्या हनुमान मंदिराजवळून दुचाकीने जात असताना पाचोऱ्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक (एमएच 19 बीजे 2175) ने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रफिक मेवाती आणि अरबाज मेवाती हे दोघे युवक जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धावले. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा रूग्णालयात रवाना केले. अपघात घडल्यानंतर नातेवाईकांसह व मित्रपरिवाराने जिल्हा रूग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. जीवलग मित्रांच्या मृत्यूमुळे अख्ख गाव शोकसागरात बुडालं. तर तरुण मुलांच्या अपघाती मृत्यूने मेवाती कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.