भुसावळ : भुसावळमध्ये १३ एप्रिलनंतर सोमवारी पाचव्या दिवशी कमाल तापमान (Temperature) पुन्हा ४३.३ अंश नोंदवले गेले. शहरातील केंद्रीय जल आयोग कार्यालयात (Office of the Central Water Commission) ही नोंद झाली. दरम्यान, पश्चिमी भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे एप्रिलच्या उर्वरित १३ दिवस तापमानाचा ४२ ते ४७ अंशांदरम्यान राहील. प्रामुख्याने २९ एप्रिल रोजी ते उच्चांकी ४७ अंशांपर्यंत पोहोचू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भुसावळची ओळख जिल्ह्यातील हॉट सिटी अशी आहे. यापूर्वी १७ मे २०१६ रोजी शहराचे कमाल तापमान (weather today) उच्चांकी ४८ अंशावर गेले होते. देशात अनेक राज्यात अधिक उष्णता असल्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० पार केल्याने मोठ्या प्रमाणावर उकाडा आहे. यामुळे विजेच्या वापर देखील अधिक वाढला आहे, तर दुसरीकडे या महिन्यापासून महावितरण कंपनीने विजेच्या युनिटेकमध्ये वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका बसणार आहे. राज्यात १ एप्रिलपासून विजेचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. १०० युनिट पर्यंत एक रुपया सात पैसे लागणार आहेत. तर १०० युनिट पेक्षा अधिक गेल्याने दोन रुपये ३० पैसे द्यावा लागणार आहे. मात्र तापमानाच्या पारा अधिक वाढल्याने विजेचे युनिट देखील वाढणार आहे. सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडणार असल्याचे दिसून येत आहे. परंतु शासनाने या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झालं आहे. वीजदर कमी करण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.
गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे आतापर्यंत मिळालेला दिलासादायक काळ संपुष्टात आला असून, वातावरण स्वच्छ होताच सूर्याचा रुद्रावतार बघावयास मिळत आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून, रविवारी 41 अंशांवर असलेला पारा सोमवारी मात्र थेट 41.8 अंशावर गेला होता. उन्हाच्या वाढत्या तडाख्याने आता जिल्हावासी होरपळून निघत आहेत. हवामान खात्याचा आतापर्यंतचा अंदाज बरोबर निघाला व मार्च, तसेच एप्रिल महिन्यातील 10 दिवस कधी ढगाळ वातावरण व कधी पावसामुळे थंडगार झाले. मात्र, आता वातावरण स्वच्छ झाले असून, हवामान खात्याचा अंदाज असूनही पाऊस पडलेला नाही. उलट स्वच्छ वातावरणामुळे तापमान वाढत चालले असून, उन्हामुळे आता जिल्हावासीयांना घराबाहेर पडणे कठीण होऊ लागले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याचा पारा 41 अंशांवर गेला आहे. तर, सोमवारी पारा थेट 41.8 अंशावर गेला होता. आता खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू झाल्याचे जाणवत आहे.