जळगावः जळगावमध्ये (Jalgaon) एका आक्षेपार्ह व्हॉटस्अॅप (WhatsApp) स्टेटसवरून दोन गटांत वाद निर्माण झाला. त्यामुळे मध्यरात्रीनंतर समाजकंटकांच्या दोन गटांनी दगडफेक केली. या घटनेत दोन वाहनांच्या काचा फुटल्या असून, एक तरुण जखमी झाला आहे. दगडफेकीमध्ये रहीस युसूफ मणियार यांच्या मालकीची आयशर ट्रक व डॉ. सुफियान शाहा यांच्या मालकीची फोरव्हिलर सेंट्रो कारच्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर अहमद अखिल पिंजारी हे रस्त्याने मलिक नगरमध्ये जात असताना डोक्याला दगड लागल्याने जखमी झाले. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. सध्याही जळगावमध्ये शांतता आहे. मात्र, सोशल मीडियावरील एखादा मेसेजही नाहक शहरास वेठीस धरून सामाजिक वातावरण गढूळ करतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हे पाहता प्रत्येकाने एक सजग नागरिक म्हणून सोशल मीडियावर व्यक्त होताना सामाजिक भान जपावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जळगावमध्ये एका तरुणाने आक्षेपार्ह व्हॉटसअॅप स्टेटस ठेवले होते. या तरुणाला मराठी शाळेच्या मोकळ्या मैदानात नेत काही तरुणांनी मारहाण केली. काही जणांनी मध्यस्थी करून ही मारहाण सोडवली. मात्र, त्यानंतर शहरात अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे मलिकनगर आणि नसीमन कॉलनीमध्ये काही समजाकंटकांनी दगडफेक केली. शिरसोली गावात हनुमान जंयतीनिमित्त पोलीस बंदोबस्त होता. ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली. तेव्हा एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
जळगावमध्ये काल रात्री हा प्रकार घडला. मात्र, सध्या शहरात सर्वत्र शांतता आहे. कुठेही अनुचित प्रकाराची नोंद नाही. तरुणांनी सोशल मीडियावर भान ठेवून व्यक्त व्हावे. आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेचा अधिक तपास सुरू केल्याची माहिती आहे.