जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भडगाव (Bhadgaon) तालुक्यात नदीच्या पाण्यात वाहून (Jalgaon Drown News) जाणाऱ्या एका महिलेचे प्राण अगदी थोडक्यात वाचले. एका वृद्ध इसमाने आपल्या जीवाची पर्वा करता या महिलेला जीवदान दिलंय. दोन किलोमीटर पर्यंत पाण्यात बुचकळ्या खात ही महिला वाहून जात होती. जिवंत वाचण्याची कोणतीही आशा वाहून जाणाऱ्या महिलेला नव्हती. पाण्यात बुडत असताना हातपाय मारणाऱ्या आणि आरडाओरडा करुन मदतीसाठी हाक देणाऱ्या या महिलेला एका वृद्ध इसमाने पाहिलं. या वृद्ध इसमाने मागचा पुढचा विचार करता धाडस दाखवलं आणि त्याने थेट नदीत उडी घेतली. त्यामुळे या महिलेचे प्राण वाचलेत. देवदुताप्रमाणे आलेल्या या वृद्ध इसमाचे महिलेनेही आभार मानलेत.
भडगाव तालुक्यातील टेकवाडे खुर्द येथील रहिवासी असलेल्या सुमनबाई पाटील या नावाची महिला गिरणा नदीपात्राजवळ गेली होती. पण पाय घसरुन सुमनबाई पाटील ही महिला नदीच्या पाण्यात पडली आणि पाण्याच्या प्रवाहात वाहत गेली. टेकवाडे खुर्द ते वाडे असं जवळपास सव्वा दोन किलोमीटरचं अंतर ही महिला पाण्यात वाहत, बुचकळे खात पुढे आली.
आता काही आपण जिवंत वाचत नाही, असं या महिलेला वाटलं. पण जीव वाचवण्यासाठी सुमनबाई धडपडू लागल्या. त्या पाण्याच्या प्रवाहात हातपाय मारत होत्या. आरडाओरडा करत मदतीसाठी याचना करत होत्या.
कहीट वस्तीलगतच्या गिरणा नदीच्या पाण्यातून वाहत असताना नाना फुलचंद परदेशी या शेतकऱ्याचं सुमनबाई पाटील यांच्याकडे लक्ष गेलं. एक महिला वाहून जात असल्याचं पाहून त्यांनीही आरडाओरडा केला. इतक्यात गिरणा काठी असलेल्या शिवाजी मोहन भिल्ल यांनी जिवाची पर्वा न करता नदीच्या खोल पात्रात उडी मारली आणि सुमनबाईंना बाहेर काढलं.
शिवाजी भिल्ल यांना मोहनबाईंना वाचवण्यात यश आल्यानंतर सुमनबाईंनीही सुटकेचा निश्वास सोडला. नंतर या महिलेला ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. थोडक्यात जीव वाचल्यामुळे सुमनबाईंनीही जीव वाचवणाऱ्यांचे आभार मानले. आता या महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत.