किशोर पाटील, जळगाव | महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. अवघ्या 13 वर्षाच्या शेतकरी पुत्राचा मृत्यू झाला आहे. गुरांसाठी शेतातून चारा घेवून येत असताना त्याच्यावर काळाने झडप घातली. जळगावमधील वाकडी म्हसावदमध्ये ही घटना घडली. गौरव आनंदा पाटील (वय १३, रा. मु. वाकडी, पो. म्हसावद, ता. जळगाव) असं मृत मुलाचं नाव आहे. चारा आणायला गेल्यावर नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
गौरव पाटील हा सोमवारी शेतात बैलगाडी घेऊन चारा घेण्यासाठी गेला होता. चारा घेऊन शेतातून पुन्हा घराकडे परतत असताना अचानक शेताच्या बांधावर चढून बैलगाडी पलटी झाली. या बैलगाडीखाली गौरव दबला जाऊन त्याच्या डोक्याला जबर मार लागला. यात दास्तावलेले बैल पळून जाण्याच्या प्रयत्नात बैलगाडी मध्ये अडकवलेला विळा हा गौरवच्या कपाळात घुसला. त्यामुळे मोठ्या प्रमाणाता रक्तस्त्राव झाला होता. मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला.
आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्याला उचलून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी आणलं होतं. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
दरम्यान, मयत गौरव यांच्या पश्चात आई, वडील, काका, 2 भाऊ, 1 बहीण असा परिवार आहे. त्याचा परिवार शेतीकाम करून उदरनिर्वाह करतो. गौरव पाटील हा थेपडे शाळेत सातवीमध्ये शिकत होता. दरम्यान, गौरवच्या मृत्युमुळे गावावर शोककळा पसरली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.