सुवर्णनगरी जळगावमध्ये सोने आणि चांदीच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. पण आज 22 मे 2024 रोजी सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. सोने 800 रुपयांनी घसरले. पण चांदीने खरेदीदारांचा हिरमोड केला. चांदी उसळून आता 93 हजारांच्या घरात पोहचली आहे. जीएसटीसह सोने आणि चांदीचा भाव मार्च, एप्रिल आणि आता मे महिन्यातही उच्चांकावरच आहे.
सोने उतरले, चांदी वधारली
जळगावच्या सराफ बाजारात सोने 800 रुपयांनी घसरले, तर चांदी 300 रुपयांनी वधारली. तर सोन्याचे दर 74 हजार 300 रुपये तोळ्यावर आले.चांदी 300 रुपयांची वाढ होऊन ती 92 हजार 800रुपये प्रति किलोवर पोहोचली. सोने चांदीच्या दरात चढ उतार सुरूच आहे. अक्षय तृतीयेनंतर मौल्यवान धातूंनी मोठी भरारी घेतली आहे.
तीन दिवसांपूर्वी किंमतीचा विक्रम
जळगावच्या सराफा बाजारात या 19 मे रोजी सोन्याच्या भावात एक हजाराने तर चांदीच्या दरात प्रति किलोमागे 3 हजार रुपयांची वाढ झाली होती. सोन्याने 75 हजारांचा आकडा पार तर चांदी सुद्धा 90 हजारांचा टप्पा ओलांडून विक्रमी दरावर पोहचली. सोन्याचा भाव जीएसटीसह 76 हजार 200 तर चांदीचे भाव प्रति किलो 91 हजारांवर पोहचला होता. आता सोने घसरले आहे. तर चांदीने आगेकूच सुरु ठेवली आहे.
दरवाढीचे कारण तरी काय
जागतिक बँकांचे व्याजदर कमी झाले आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वळवला आहे. तर चीनमध्ये सोने आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाली आहे. अनेक देशाच्या मध्यवर्ती, केंद्रीय बँक सोन्याचा साठा करुन ठेवत आहेत. या सर्व कारणांमुळे सोन्यामध्ये सातत्याने भाव वाढ होत असल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.