जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वक्ते तथा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी पोलिसांना चकवा देऊन अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. शरद कोळी यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर भाषण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणी शरद कोळी यांना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस शरद कोळी यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता कोळी अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती समोर आलीय.
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वातील महाप्रबोधन यात्रा सध्या जळगावात सुरु आहे. त्यांच्या या यात्रेदरम्यान ठाकरे गटाचे वक्ते तथा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी सभेत भाषण करताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर प्रचंड निशाणा साधला होता.
शरद कोळींनी टीका करताना प्रभोषक वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भाषण करण्यास बंदी घातली. याच मुद्द्यावरुन पोलीस जेव्हा शरद कोळी यांना ताब्यात घेण्यासाठी ते आज ज्या हॉटेलवर थांबले होते त्या हॉटेलवर गेले तेव्हा पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली.
पोलीस आणि शिवसैनिक यांच्यात वाद झाल्यानंतर सुषमा अंधारे इतर पदाधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्याच्या दिशेला पायी चालत गेल्या. त्यानंतर पोलीस शरद कोळी यांना ताब्यात घेण्याच्या तयारीत होते. पोलिसांसाठी तसा आदेशच वरिष्ठ पातळीवरुन आला होता, अशी चर्चा आहे.
या दरम्यान पोलिसांचे आदेश झुगारून शहर पोलीस ठाण्याबाहेरून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह शरद कोळी महापौरांच्या गाडीतून चोपडा येथे महाप्रबोधन सभेकडे रवाना झाले.
यानंतर पोलिसांनी शरद कोळी यांना ताब्यात घेण्यासाठी चोपडा शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडावद येथे नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान चोपडाकडे निघालेल्या सुषमा अंधारे यांच्या ताफ्यातील वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली.
या दरम्यान महापौरांच्या गाडीतून शहर पोलीस ठाण्याहून निघालेले शरद कोळी मात्र चोपड्याच्या सभेकडे न जाता पोलिसांना चकमा देत अज्ञात स्थळी रवाना झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.