Jalgaon Railway CCTV Women Life Save : ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी म्हण मराठीत प्रचलित आहे. याच म्हणीचा प्रत्यय जळगावात आला आहे. एक महिला रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक समोरुन मालगाडी आली. पण तिचं नशीब इतकं बलवत्तर होतं की तिच्या मदतीला चक्क देवदूतच धावून आला. जळगाव रेल्वे स्थानकावर ही संपूर्ण घटना घडली. ही संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जळगाव रेल्वे स्थानकावर तीन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत एक महिला रेल्वे रुळ ओलांडत दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचवेळी समोरुन एक मालगाडी येते. यावेळी आजूबाजूला असलेले प्रवाशी जोरजोरात आरडाओरड करतात. यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचा एक जवान धावत जाऊन त्या महिलेला रुळावरुन प्लॅटफॉर्मवर ओढतो. त्यामुळे सुदैवाने तिचा जीव वाचतो.
सी जे चौधरी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाचे नाव असून त्यांच्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव वाचला. यानंतर या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. सध्या या जवानाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्याच्या प्रसंगावधानाचे कौतुकही केले जात आहे. यासाठी त्याला त्याच्या वरिष्ठांकडून शाबासकीही मिळाली. आता रेल्वे सुरक्षा बलाचे जवान सी.जे.चौधरी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं याची संपूर्ण माहिती दिली.
“मी प्लॅटफॉर्मवर एका ठिकाणी उभा होतो. त्यावेळी अचानक लोकांच्या आरडाओरड करण्याचा आवाज येऊ लागला. त्यावेळी मी पाहिलं तर एक महिला रेल्वेचे रुळ ओलांडत होती. मी त्या महिलेला रोखण्याचा प्रयत्नही केला. पण त्याचवेळी एक मालगाडी त्या ठिकाणाहून जात होती. मला वाटलं आता ही महिला मालगाडीच्या खाली येणार तेवढ्यात मी धावत जाऊन महिलेला वर ओढण्याचा प्रयत्न केला,” असेही सी.जे.चौधरीने म्हटले.
“माझ्या पहिल्या प्रयत्नात ती महिला प्लॅटफॉर्मवर आली नाही. तिचा हात सुटला. मीदेखील जमिनीवर पडलो. तिला रेल्वेची धडक बसल्याने ती आणखी पुढे गेली. मी पुन्हा उठलो आणि पळत जाऊन महिलेला वर खेचून प्लॅटफॉर्मवर आणलं. त्यामुळे तिचा जीव बचावला”, असा थरारक प्रसंग सी.जे.चौधरी यांनी सांगितला.
“जेव्हा आमच्या अंगावर वर्दी असते, तेव्हा मला फक्त आमचं कर्तव्य दिसत असतं. त्यामुळे मला माझ्या जीवाची परवा नव्हती. फक्त महिलेचा जीव वाचवा, तेवढेच माझ्या डोळ्यासमोर होतं. त्यामुळे माझं कर्तव्य आधी आणि त्यानंतर माझा जीव याप्रमाणे मी त्या महिलेचा जीव वाचवला. माझ्या या कामामुळे मला वरिष्ठांकडून शाबासकी मिळाली. पण त्यापेक्षा जास्त माझ्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग होता आणि तो कायम अविस्मरणीय राहील. मला माझा स्वत:चा अभिमान वाटतोय. मी ऑन ड्युटी असताना एका महिलेचा जीव वाचविण्याचे खूप आत्मिक मोठं समाधान आणि आनंद मला आहे आणि माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे”, अशा भावना यावेळी सी.जे. चौधरी यांनी व्यक्त केल्या.