जळगावमध्ये ‘लखपती दिदी’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपस्थित महिला वर्गाला संबोधित केलं. यावेळी महिला सक्षमीकरणावर भाष्य करण्यात आलं. लाडकी बहिण योजनेवर मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केलं. महिला सक्षम करण्याचं केवळ स्वप्न पाहिलं नाही, तर हे स्वप्न मोदीजींनी पूर्ण केलं, असं ते म्हणाले. महिलांना संधी दिली तर त्या जग बदलू शकतात, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. महिला जबाबदारी यशस्वी पेलू शकतात, असं अजित पवार या कार्यक्रमात म्हणाले.
‘लखपती दिदी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी महिलांना प्रोत्साहन दिलं. तुमच्यासाठी हा आनंद सोहळा आहे. जळगाव ही सोन्याची भूमी आहे. इथलं सोनं बावनकशी आहे. इथल्या बहिणीही सोन्यापेक्षा सरस आहे. ११ लाख महिला लखपती होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी योजनेचाही त्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलला आहे. तीन मोफत सिलिंडर देण्याची योजना सुरू केली. मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची योजनाही हाती घेतली आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासाला आम्ही प्राधान्य देत आहोत. महिला सक्षम करण्याचं केवळ स्वप्न पाहिलं नाही तर मोदींनी हे स्वप्नपूर्ण केलं आहे. १० कोटी महिलांना त्यांनी आत्मनिर्भर केलं आहे, असं ते म्हणाले.
आज आनंदाची गोष्ट आहे. लखपती दिदीचं संमेलन महाराष्ट्रात जळगावात होत आहे. आज महिलांनी विक्रमी गर्दी करून सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. महिलांना संधी दिली तर त्या विश्व बदलू शकतात हे आपल्याला पाहायला मिळालं. मोदी म्हणतात, विकसित भारत हा महिलांच्या माध्यमातूनच होऊ शकतो. महिला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्यधारेत आल्या तरच देशाचा उद्धार होईल. म्हणून बेटी बचाव पासून ते लखपती दीदी पर्यंत त्यांनी मोठ्या योजना आणल्या आहेत. २०२९नंतर देशाचा कारभार महिलांच्या हाती देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील विकासाचा रथ जळगावात आला आहे. मी आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात एवढ्या प्रचंड संख्येने महिलांनी महाराष्ट्रात पंतप्रधानांचं स्वागत केलं आहे. हे मी पहिल्यांदाच पाहत आहे. परिस्थिती वेगळी आहे. नैसर्गिक परिस्थिती चांगली नाही. पाऊस सुरू आहे. तरीही महिला आल्या आहेत. तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवायचं मोदींचं उद्दिष्टं आहे. आपण महाराष्ट्रात ५० लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा संकल्प करूया. महिलांवर जबाबदारी टाकली तर महिला जबाबदारी यशस्वी पेलू शकतात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्याच दिशेने आपण प्रवास करूया, असं अजित पवार म्हणाले.