जळगावमध्ये शासनाकडून महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबोधित केलं. तेव्हा त्यांनी अजित पवार यांच्याबाबतही विधान केलं. तसंच गुलाबी रंगावरही गुलाबराव पाटील बोलते झाले आहेत. घड्याळ , धनुष्यबाण आणि कमळ येथे तिघे एकाच व्यासपीठावर असल्यामुळे टेन्शन नाही. अजितदादा आम्ही तुमची काळजी घेतली आहे. तुमचा गुलाबी कलर आम्ही समोर बसवला आहे. त्यामुळे अजितदादा पुढच्या काळात आपलं 100% भलं झाल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास वाटतो, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमात बोलताना बहिणींवर चारोळी म्हटली आणि मुख्यमंत्र्यांचा शिंदे उर्फ एकनाथरावजी मामा असा केला उल्लेख केला. मी प्रथमतः आदरणीय शिंदे साहेबांचं आपल्या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो.दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. आपल्या बहिणींच्या मागे जन्मभर उभा राहील, अशा पद्धतीने शपथ खाणारे आपण सगळे भाऊ… त्याच पद्धतीने बहिणींच्या भावांच्या पाठीशी उभा राहण्याची शपथ घेतलेले हे आपले तिन्ही नेते आज जळगावमध्ये आले आहेत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
आज आपल्याला सांगायला हे भाऊ आले आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये पाच लाख वीस हजार अर्ज भरले आहेत. या सगळ्यांचा विचार केला तर महिन्याला 78 कोटी आणि वर्षाला 940 कोटी रुपये हे जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
विरोधकांकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’वर टीका केली जाते. या टीकेलाही गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे. काही लोक भूलथापा मारत आहेत. मात्र आपले गल्ला मंत्री अजितदादा पवार यांनी 35 हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका. विरोधकांना माहिती आहे की घोडे फरार आणि टांगा पलटी होणार आहे, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना टोला लगावला आहे.