किशोर पाटील , प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, जळगाव | 10 मार्च 2024 : शिंदे गटाचे नेते, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांना काही कामच नाहीये. त्यांना भांडी काय हे माहीत नाही तर घासायचा विषय नंतर येईल, असं गुलाबराव पाटील म्हणाले. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मनसे- भाजप युती चर्चा होतेय. यावरही गुलाबराव पाटील यांनी मत व्यक्त केलं. जळगावातील धरणगाव तालुक्यातील चोरगाव इथल्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.
मनसे महायुतीत येणार का? असा प्रश्न विचारला असता गुलाबराव पाटील यांनी यावर उत्तर दिलं. मनसे आणि भाजपचे युती झाली तरी मनसे शिवसेना आणि भाजपचा एकच विचार आहे. त्यामुळे मनसेसोबत युती झाली तर चांगली गोष्ट होईल, असं म्हणत मनसे आणि भाजपच्या युती संदर्भात चर्चांवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
भाजप शिवसेनेचीची मूळ युती होती. ती कायम ठेवण्याकरिता आम्ही उठाव केला. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार तुटलं फुटलं आणि मी सुद्धा तुम्ही सर्व बघितलं. काय झाडी काय डोंगर… सब कुछ ओके 50 ओके अशी टीका आमच्यावर झाली. आम्ही उठाव करून हे सरकार प्रस्थापित केलं आणि त्यामुळेच एवढी कामे मतदार संघात मी करू शकलो.शरद पवार संपूर्ण महाराष्ट्राला फिरवतात. पवारांच्या गावात वाघ नाही येणार तर मग काय येईल, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
घरकुलाच्या बाबतीत काही अधिकारी लोक गरिबांचे रक्त पितात. मात्र घरकुल्कल्यांचा पैसा खाल तर तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. पैसे खायला लय जागा आहे. पण गरिबांचे पैसे खावू नका. लय तळतळाट भोगावे लागतील. कोणताच आजार नाही थेट रामकृष्ण हरी होवून जाईल. शेतकरी असेल, अपंग असेल, घरकुल असेल अशी सर्व काम आपण करत आहेत. त्यातून आशीर्वाद मिळत आहे. लोक म्हणतात तू मोठा की देव मोठा… पण आपल्यापेक्षा जो कुणाच्या मदतीसाठी अडचणीच्या काळात उभा राहिला. तोच मोठा…, असं गुलाबराव पाटील या भाषणादरम्यान म्हणाले.