रवी गोरे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुक्ताईनगर- जळगाव | 31 डिसेंबर 2023 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जरी लांब असली तरी देशात आणि राज्यातही चर्चा होतेय ती निवणुकीची, जागावाटपाची आणि उमेदवारीची… अशातच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे जळगावच्या भाजपकडून दुसऱ्यांदा खासदार आहेत. जर रक्षा यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादीचे एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली तर सासरे विरुद्ध सून अशी लढत होऊ शकते.
रावेर लोकसभेची जागा हे राष्ट्रवादीला मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळाली तर प्राधान्याने माझ्या नावाचा विचार करावा, अशी मागणी मी सुद्धा केली आहे. पक्षाने देखील मला लढवण्याबाबत सांगितलं आहे. लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी मी सुद्धा इच्छुक आहे. पक्षाने देखील मला आदेश दिला आहे, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरही खडसेंनी प्रतिक्रिया दिलीय. महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा वगैरे काहीही नाही. जागावाटप ही अंतिम टप्प्यात आली आहे. पंधरा दिवसात जागा वाटपाचा निर्णय होईल, असं खडसेंनी सांगितलं आहे.
महायुतीने 45 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीने 45 पेक्षा अधिक जागा जितू असा दावा केला बरं झालं. त्यांनी 48 जागा जिंकू असं सांगितलं नाही. तीन जागा ह्या कोणासाठी सोडल्या? आलेल्या आलेल्या सर्वे मध्ये असं दिसतंय हा महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील. महाविकास आघाडीचा 35 ते 36 जागेवर विजय होईल असं मला वाटतं, असं खडसे यांनी म्हटलंय.
पुढचं येणार नवीन वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक यश मिळावं, हाच आमचा प्रयत्न आहे. हाच आमचा नवीन वर्षाचा संकल्प आहे, असं खडसेंनी सांगितलं आहे.
सर्व विरोधक विरोधक यांच्या विरुद्ध एक अशी स्थिती आहे. ती म्हणजे जिल्ह्यात एकमेव माझ्या विरोधात सर्वच आहेत. मी मला विरोधकांना एकच सल्ला द्यायचा आहे. माझा विरोध करण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, असं खडदे म्हणालेत.