किशोर पाटील, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, जळगाव | 02 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका जाहीर केली आहे. नाना पटोले यांनी खडसेंना लगावला आहे. रावेर लोकसभेची जागा जिंकण्याचं मेरिट हे काँग्रेसचं आहे. त्यामुळे मेरिटवर ही जागा काँग्रेसच्याच वाट्याला येईल. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील हे सुद्धा ही जागा लढवण्याबाबत बोलू शकतात. मात्र आम्ही अशा पद्धतीचा आततायीपणा करत नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे.
कोण कुठे लढणार. रावेरमध्ये कोण लढणार याबाबतचा योग्य तो निर्णय हे वरिष्ठ घेतील. वरच्या पातळीवर कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे खाली कुणी काही बोलत असेल त्याला काही अर्थ नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी एकनाथ खडसे यांच्या रावेर लोकसभा निवडणूक लढण्याच्या इच्छेवर विरजण घातलं. नाना पटोले जळगावमध्ये बोलत होते. तेव्हा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप कुठपर्यंत आलं आहे? महाविकास आघाडीत काय चर्चा सुरु आहे? यावर नाना पटोले यांनी भाष्य केलं. जागा कुणाला कमी किंवा जास्त मिळतात.यापेक्षा तानाशाही प्रवृत्ती आणि लोकशाहीला न मानणाऱ्या भाजप सरकारला आम्हाला हद्दपार करायचं आहे. तसा आमचा निर्धार आहे. मोदी सरकारला हद्दपार करण्यासाठी आम्ही लढतोय, असं पटोले म्हणाले.
नवीन मोटारवाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरू आहे. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारचा तुकलकी निर्णय आहे. टँकर चालकांच्या निर्णयामुळे संपूर्ण देशातला जनजीवन विस्कळीत झालं आहे. जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. वाहन चालकांसाठी केलेला हा कायदा काळा कायदा आहे. त्यामुळेच त्याच्या विरोधात सर्व चालक हे रस्त्यावर उतरले आहेत. जन जीवन विस्कळीत करण्याचं काम तानाशाही प्रवृत्ती म्हणजेच या केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. जनजीवन विस्कळीत व्हावं प्रभावित व्हावं असा प्रयत्न जाणून-बुजून भाजप करत आहे, असं ते म्हणाले.