रावेर, जळगाव | 24 सप्टेंबर 2023 : नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. यामुळे स्थानिकांच्या घरात पाणी शिरलं. घरातील वस्तू, खाद्यान्नचं नुकसान झालं. यावरून ठाकरे गटाने नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. झाडं तोडली जात आहेत. त्याचा हा परिणाम आहे. मात्र कॉंक्रिटीकरण आणि झाडे तोडणं म्हणजे विकास झाला, असं नाही, असं आदित्य ठाकरे म्हणालेत. त्याला आता मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांना म्हणावं. नागपूरला जा… तिथं जाऊन एकदा बघा. नागपूरच्या लोकांना विचारा. विकास काय झालाय तो… तुम्हाला अडीच वर्षे संधी दिली होती. अडीच वर्ष तुम्ही घरी बसून गप्पा मारल्या. ट्विट करायचं म्हणून लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली. आता अशी टीका करण्यात काहीही अर्थ नाही, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी आघाडी केली आहे. त्याला इंडिया आघाडी असं नाव दिलं आहे. त्यावर महाजन यांनी टीका केली आहे. सर्व एकत्र व्हा. कुणीच बाजूला राहू नका. एकत्र होऊन आमच्या विरोधात लढा… मतदारच तुम्हाला उत्तर देतील. आधी तुमच्या आघाडीचं पंतप्रधानपदासाठीचं नाव घोषित करा. नंतर बघा. तुमच्या पाठीमागे कोणता पक्ष राहतो ते बघा. विरोधकांना 2024 मध्ये भाजप विरोधात एकजुटीने निवडणूक लढवायच्या आहेत. मात्र त्यांना यश येणार नाही. आमचंच सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
मनोज जरांगे यांचं उपोषण आणि मराठा आरक्षणावरही गिरीश महाजन यांनी आपली भूमिका मांडली. जरांगे पाटील यांनी 40 दिवसाची मुदत दिलेली आहे. त्यासाठी आयोगही नेमलेला आहे. शिंदे या समितीचा अहवाल 40 दिवसांनी येईल. त्यावेळेस सकारात्मक निर्णय सरकार घेईल, असं महाजन म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल मुंबईत आले होते. त्यांनी लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर माधुरी दीक्षित भाजपच्या तिकीटावर लढणार असल्याची चर्चा होत आहे. त्यावर गिरीश महाजान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे तर मी मीडियाच्या माध्यमातूनच ऐकतोय. लोकसभेची नावे निश्चित करण्यासाठी अमित शाह आलेले नव्हते. ते गणपतीच्या दर्शनासाठी आले होते, असं महाजन म्हणाले.