जळगाव : भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलंय. मविआ सरकारच्या काळातील कामकाजावरही महाजनांनी टीका केलीय. ठाकरे सरकारने अडीच वर्षात दमडी सुद्धा फेकून मारलेली नव्हती, असं महाजन यांनी म्हटलं आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यावरही महाजन बोललेत. “गेल्या दोन-तीन दिवसापासून अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाला आहे.मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अवकाळी नुकसानग्रस्तांना भरीव निधी राज्य सरकार देईल. सरकार शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या पाठीमागे खंबीर उभी आहे”, असं ते म्हणाले आहेत.
कर्नाटकात सध्या निवडणूक होतेय. यात विजय आमचाच होईल, असा विश्वास महाजनांनी व्यक्त केलाय. कर्नाटक निवडणुकीची परिस्थिती कुणी काहीही सांगत असलं तरी शंभर टक्के विजय आमचाच होणार आहे. चांगलं बहुमत आम्हाला त्या ठिकाणी मिळेल, असं महाजन म्हणालेत.
मी दहा तारखेपासून कर्नाटक दौऱ्यावर होतो मात्र माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे मी आलो, असं महाजन यांनी सांगितलं आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरही गिरीश महाजन यांनी भाष्य केलंय. मार्केट कमिटीच्या निवडणुका झाल्या एकही दिवस मी मतदारसंघात नव्हतो. मात्र जामनेर तालुका हा माझा असा आहे मी मतदार संघात असो किंवा नसो जनतेचा विश्वास माझ्यावर आहे. त्यामुळेच 18 जागेवर आमचा विजय झाला, असं गिरीश महाजन म्हणालेत.
आमचे भाजपचे कार्यकर्ते यांची फळी चांगलं काम करतात. जनतेचा विश्वास आणि सततची जनतेला मिळत असलेली सेवा त्यामुळेच हा विजय शक्यझाला, अशी पहिली प्रतिक्रिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या विजयानंतर गिरीश महाजन यांनी दिली आहे.
जळगावमध्ये सलग पाच ते सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट होतेय. जिल्ह्यातील अनेक भागात या पावसामुळे फटका बसलाय. जामनेर, चोपडा, मुक्ताईनगर इतर काही भागात मध्यरात्री अवकाळी पावसाचा पुन्हा फटका बसलाय. अनेक घरांची पडझड झालीय. काही घरांचे छत उडालेत तर काढणीला आलेल्या पिकाचंही नुकसान झालंय. यावरही महाजनांनी भाष्य केलंय.