कोलकाता आणि त्यापाठोपाठ बदलापूरमधील महिला अत्याचाराच्या घटनांचा महाराष्ट्रभरात निषेध केला जात आहे. ठिकठिकाणच्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. विरोधकांनी या घटनांवर आवाज उठवला आहे. ठिकठिकाणी याबाबत आंदोलनं केली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात असताना त्यांनी या मुद्द्यावर बोलावं, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावातील ‘लखपती दिदी’ कार्यक्रमात बोलताना महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या मुद्द्यावर भाष्य केलं. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सोडू नका… त्यांचा हिशोब करा, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका, त्याला कोणत्याही प्रकारे मदत करणारे वाचले नाही पाहिजे. रुग्णालय, शाळा, पोलीस व्यवस्था, कोणत्याही ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल तर हिशोब करा. वरपर्यंत मेसेज जाऊ द्या. हे पाप अक्षम्य आहे. सरकार येईल जाईल,. पण जीवनाची रक्षा, नारीची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. सर्व राज्य सरकारांना सांगतो, आणि राजकीय पक्षांना सांगतो, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा देण्यासाठी आमचं सरकार कायदा कडक करत आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
एवढ्या मोठ्या संख्येने महिला आल्या आहेत. आधी तक्रार येत होती, वेळेत एफआयआर होत नाही. सुनावणी होत नाही. खटला उशीरा सुरू होतो. निर्णय उशिरा येतो. या अडचणी भारतीय न्याय संहितेतून दूर केला आहे. एक चॅप्टर महिला आणि बाल अत्याचाराचा आहे. पीडित महिलांना पोलीस ठाण्यात जायचं नसेल तर ई एफआयआर करू शकते. ई एफआयआरमध्ये कोणी छेडछाड करणार नाही याचीही व्यवस्था केली आहे. त्यामुळे चौकशी चांगली होईल आणि दोषींवर शिक्षा करण्यास मदत होईल, असं नरेंद्र मोदी जळगावात म्हणाले.
नव्या कायद्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणावर फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली आहे. लग्नाच्या नावाने मुलींची फसवणूक केली जायची. त्यावर शिक्षा होत नव्हती. आता यावर आम्ही कायदे केले आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार महिलांच्या सोबत आहे. राज्याच्या सोबत आहे.अत्याचार करणारी मानसिकता आपल्याला दूर करायची आहे, असं ते म्हणाले.