उन्मेश पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधलं. यावेळी खासदार संजय राऊत यांच्यासोबतच इतरही ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. करण पवार आणि शेकडो कार्यकर्त्यांसह उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाने करण पवार यांना जळगावमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपने उन्मेश पाटील यांना तिकीट नाकारत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी उन्मेश पाटील यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.
पक्षनिष्ठ हा गुण प्रत्येकामध्ये असला पाहिजे आणि तो प्रत्येकाने जोपासला पाहिजे, असं म्हणत जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या उन्मेश पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. उमेदवार करण पवार असो की उन्मेष पाटील असो ही युद्धभूमी आहे… युद्धभूमीमध्ये सर्वजण आपापलं काम करत असतो. त्या पद्धतीने आम्ही आमचं काम करू, असं स्मिता वाघ म्हणाल्या आहेत.
उन्मेश पाटील यांना एकदा आमदारकी, एकदा खासदारकी असं पक्षाने भरभरून दिलं. भाजप म्हणून भाऊ त्यांच्या पाठीशी नसते तर त्यांना आमदारांनी खासदारकी पर्यंत उन्मेश पाटील पोहोचले नसते. मनातून पक्षाचं स्थान जाणं हे एवढ्या लवकर शक्य नाही. त्यामुळे शरीराने जरी उन्मेशदादा तिकडे असले तरी मनाने मात्र ते भाजपमध्येच आहेत. पक्षात कधीही बदलाच राजकारण नव्हतं. पक्षाचे त्या त्यावेळी निर्णय घेतले जातात त्यानुसारच पक्षाने यावेळी सुद्धा तो निर्णय घेतला, असं स्मिता वाघ म्हणाल्या.
प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असतं त्यामुळे तो त्या पद्धतीने घेत असतो. आम्ही जन्माला भाजप झेंडा घेवून आलो आणि मरतानाही भारतीय झेंडा घेवून च जाऊ हे आमचे तत्व ठरलेला आहे. मी त्यांच्या पाठीमागे थांबले होते… मात्र तर ते थांबले नाहीत… त्यांनी त्यांचा निर्णय घेतला… मात्र जळगावची जागा भाजपच जिंकेल, असं स्मिता वाघ म्हणाल्या.
या जळगाव मतदारसंघात गेल्या 30 वर्षापासून खासदार हा भाजपचा होता. यावेळी सुद्धा भाजपचाच खासदार होईल, असा विश्वास आहे. तळागाळातला कार्यकर्ता हा भाजप सोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला विकास हा जनतेसमोर आहे. जनता विकासाच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास स्मिता वाघ यांनी व्यक्त केला.