ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपला मोठा धक्का बसला आहे. जळगावचे खासदार उन्मेश पाटील हे उद्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या त्यांचा ठाकरे गटात प्रवेश होईल. त्यांच्यासोबत इतर भाजपचे नेते आणि कार्यकर्तेदेखील असणार आहेत. जळगावमधून स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. यावरून उन्मेश पाटील नाराज होते. आता अखेर ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यावर भाजपच्या उमेदवार स्मिता पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच भाजपच्या विजयाचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत हे उन्मेश पाटील यांचे मित्र असल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी उन्मेश पाटील हे गेले आहेत. त्यामुळे मला अजूनही असं वाटत नाही की उन्मेश पाटील हे असा काही निर्णय घेतील. मी आज प्रचारांमध्ये आहे. त्यामुळे मी अशी कुठली बातमी बघितली नाही. मात्र माझा अजूनही ठाम विश्वास आहे की अशा कुठल्याही घडामोडी घडणार नाहीत. उन्मेश पाटील भाजपमध्येच राहतील, असं स्मिता वाघ म्हणाल्या.
कोणी कसं जीवन जगावं, हा ज्याचा त्याचा व्यक्ती प्रश्न असतो. मात्र मी माझ्या तत्वांशी आजपर्यंत तडजोड केली नाही. मी एकनिष्ठ राहिले. पक्षासोबत एक निष्ठा राहणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्ते च्या पाठीशी जनता ही उभी राहील. भाजपचे पदाधिकारी जरी ठाकरे गटात गेले आणि ते स्वतः उमेदवार असले तरी जनता माझ्या पाठीशी राहील असा मला विश्वास आहे, असं स्मिता वाघ म्हणाल्या.
काही झालं तरी मोदींनी जो विकास केलेला आहे. त्यामुळे जनता माझ्या पाठीशी राहील आणि प्रचंड मताधिक्याने मी निवडून येईल. असा माझा ठाम विश्वास आहे. मोठे मोठे भाजपचे पदाधिकारी जरी ठाकरे गटात गेले तरी आमच्यासोबत नरेंद्र मोदी आहेत. विकास कामं आहेत. त्यामुळे त्याचा फरक पडणार नाही, असं स्मिता वाघ यांनी म्हटलं.
जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने भाजपतील एक गट नाराज होता. भाजपचे विद्यमान खासदाल उन्मेश पाटील हे स्वत: नाराज होते. त्यांची नाराजी आता उघड झाली आहे. पाटील यांनी अखेर ठाकरे गटात जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला आहे. उद्या 12 वाजता उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.