राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा ताळमेळ बसलेला दिसत नाही. महायुती आणि महाविकास आघाडी अजून जागा वाटपाचे कवित्वातच अडकली आहे. दोन्ही गटात बंडखोरांना शांत करण्याचे मोठे आवाहन आहे. भाजपाने मनसेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केल्याने इकडं दादा गटात आणि शिंदे गटात खळबळ उडाली आहे. त्यातच आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उमेदवारांची घोषणा करणार आहेत. मराठा फॅक्टरची चुणूक दाखवल्यानंतर आता मुस्लिम आणि दलित मतांची मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न कुणाचे पानीपत करणार हे समोर येईलच. या पेचात आता शिंदे सेनेची मुलूख मैदान तोफ गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे एक विधान सध्या चर्चेत आले आहे. त्यांनी एकदम खुसखुशीत प्रतिक्रिया दिली आहे.
गुलाबराव पाटील यांचे कनेक्ट टू वोटर्स
जनतेच्या आशीर्वाद पाहिजे असतील तर मी त्यांच्या घरापर्यंत गेलं पाहिजे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. आतापर्यंत मी जळगाव ग्रामीण मतदारसंघातले. 42 गाव माझे झालेले आहेत. 100 च्या जवळपास गावातून बाकी आहे. रोज दिवसभरामध्ये मी दहा ते पंधरा गाव हे फिरत असतो. 13 ते 14 तारखेला माझा प्रचार संपणार आहे. त्यानंतर जाहीर सभांचा कार्यक्रम सुरू होईल. जनतेचा मोठा प्रतिसाद दिसतो आहे मात्र त्यातच लाडक्या बहिणीचा मोठा प्रभाव या निवडणुकीत पाहायला मिळतो आहे. कार्यकर्ते दिवाळी सोडून माझ्याकरता फिरता आहेत त्यांचे उपकार कसे फेडावे हेच मला समजत नाही. कार्यकर्त्यांचा हे प्रेम आहे या प्रेमाचे पुढे माझे कुठलेही शब्द हे कमी आहेत माझ्याजवळ या कार्यकर्त्यां प्रेमासाठी शब्द नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आता पैलवान उतरला
मनोज जरांगे पाटील आज त्यांच्या उमेदवारांची अथवा कुणाला पाठिंबा देणार याची घोषणा करणार आहे. त्यावर गुलाबराव पाटील यांना विचारले असता, त्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. आता पैलवान उतरला त्यामुळे समोर कोणीही पैलवान आला तरी त्याला कुस्ती खेळायची आहे. आता जनता जो आशीर्वाद देईल. ज्या पैलवानाच्या डोक्यावर हात ठेवीन तो पैलवान जिंकेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दोघांनी टीका टाळावी
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. दोघांनी एकमेकांवर जळजळीत टीका केली आहे. त्यावर गुलाबराव पाटील यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. मी काय ऐकलेलं नाही. मात्र दोघांनी एकमेकांवर अशा पद्धतीने टीका करू नये, ही माझी विनंती आहे. दोघांनी एकमेकांवर टीका करू नये आणि कोणी कोणाच्या बाबतीमध्ये मोठ्या गोष्टी करू नये असं मला वाटतं, असे पाटील म्हणाले. तर माहिम मतदारसंघातील घाडमोडींवर बोलतानाशेवटी हा विषय मुख्यमंत्री शिंदे यांचा आहे आणि ते बरोबर हा विषय आटोक्यात काढतील, असे ते म्हणाले.