जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जळगावमध्ये आले आहेत. तिथे त्यांची भव्य सभा होणार आहे. या सभेआधी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. त्यात त्यांनी महाराष्ट्रतील सध्याच्या दुष्काळी परिस्थिती. मराठा आरक्षण, इंडिया नावावरुन सुरु असलेलं राजकारण यावर भाष्य केलं. “राज्यातल्या काही जिल्ह्यात सामान्य लोकांच्या दृष्टीने चिंताजनक स्थिती आहे. त्याचा आढावा घेऊन लोकांशी संपर्क साधावा या हेतूने हे दौरे आहेत. यापूर्वी मराठवाड्यातील बीड, त्यानंतर कोल्हापूर इथे जाऊन आलो. आज खान्देशातील स्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पाऊस नसल्याने चिंताजन स्थिती आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बिकट आहे” याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधलं.
“सगळं चित्र चिंताजनक आहे. लोड शेडिंगची बिकट परिस्थिती आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थिती, तर दुसरीकडे विजेचा तुटवडा आहे. 1 रुपयांच्या विम्याचा प्रश्न एवढंच नाही, तर सरकारकडून याबाबत आढावा घेण्याची आवश्यकता आहे. दुष्काळ अजून जाहीर करायचा नसेल, तरी त्याची तयारी आतापासून करावी लागेल. किमान नोंदी घेऊन माहिती तरी गोळा करावी लागेल. जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागेल” अस शरद पवार म्हणाले.
‘भारत काय आणि इंडिया काय काही फरक पडत नाही’
“इंडिया नाव हटवण्याबाबत मला काही माहिती नाही. इंडिया नाव हटवण्याचा कोणाला अधिकार नाही. भारत काय आणि इंडिया काय काही फरक पडत नाही” असं शरद पवार म्हणाले. मराठा समाजावर झालेल्या लाठी हल्ल्याप्रकरणी म्हणाले की, “आम्हाला एवढं माहिती आहे की लाठी हल्ला झाला. ऑर्डर कोणी दिली याची चौकशी सरकारने करावी” “फडणवीसांनी मागितली माफी तर ठीक आहे. गोवारीचा लाठीहल्ला झाला नाही, तर चेंगरा चेंगरी होती” असं शरद पवार म्हणाले. “ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसीमधील गरीबांवर अन्याय होईल. 50 टक्के आरक्षण मर्यादा वाढवण्याची गरज आहे” असं शरद पवार म्हणाले.
ताकद पाहून मोदी सरकार अस्वस्थ
“इंडिया आघाडीची ताकद पाहून मोदी सरकार अस्वस्थ झालं आहे. संसदेत महिला आरक्षण विधेयक आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार. भाजपाचे उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी काम करु” असं शरद पवार यांनी सांगितलं.