जळगाव : जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आतापर्यंत शासकीय रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळणे, औषधांचा तुटवडा असणे, उपाचाराअभावी रुग्णाचा मत्यू अशा घटना पहायला मिळाल्या. पण आता मात्र काळजावरच घाव करणारी घटना उघडकीस आली आहे. डॉक्टर्स आणि परिचारिकांच्या चुकीमुळे रुग्णालयात चक्क नवजात शिशूंची अदलाबदल झाल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉक्टर्स आणि परिचारिकांच्या चुकीमुळे पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अदलाबदल झालेले एक स्त्री तर दुसरं पुरूष जातीचे अर्भक आहे.
दोन्ही मातांनी मुलगा माझाचं म्हणून दावा केला आहे. यामुळे पेच निर्माण झाल्याने डीएनए चाचणी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. डीएनए चाचणीनंतर बालके मातांच्या स्वाधीन करण्यात येतील. डीएनए चाचणीचा अहवाल येण्यासाठी पाच दिवस लागणार आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रसूत झालेल्या दोन नवजात शिशूंची अदलाबदल झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. या प्रकारानंतर पालकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. मंगळवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सुवर्णा सोनवणे आणि प्रतिभा भिल या दोन्ही महिलांची प्रसुती झाली. एकीला मुलगा आणि दुसरीला मुलगी झाली. पण नवजात शिशू पालकांकडे सोपवताना निरोप देण्यात झालेल्या गोंधळामुळे त्यांची अदलाबदल झाली.
प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि परिचारिका यांच्या हातून ही चूक झाली. या चुकीमुळे नेमकं कोणतं बाळ कोणाचं हा प्रश्न निर्माण झाला. दोन्ही मातांनी मुलावरच दावा केल्याने वाद वाढलाय. वाद वाढत असल्याचे पाहून रुग्णालय प्रशासनाने दोन्ही नवजात शिशूंना आपल्या ताब्यात घेतले. त्यांना नवजात बालक अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
खरे पालक शोधण्यासाठी आता दोन्ही शिशू आणि मातांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी चौकशी समिती गठित केली आहे. प्रशासन मात्र यावर काहीही बोलायला तयार नाही. नातेवाईकांनी प्रशासनावर भोंगळ कारभाराचा आरोप केला आहे.