प्रतिनिधी, जळगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात एकला चलो रेची हाक दिली आहे. ही दिलेली हाक खरी की? राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे खरं. असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी पाटण्यात नितीश कुमार यांनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहणार आहेत, असं वक्तव्य केलं. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, आम्ही महाराष्ट्रात स्वबळावर लढू. नेमकं खरं कोणाचं मानायचं. हे काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी सांगतील का ? असा सवाल ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्याबाबतच्या चर्चेवर ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मुंबईतील घटनेप्रमाणे दिल्ली आणि पालघर मध्येही भयावह घटना घडल्या. मात्र या घटनेत देशपांडे, भिडे नाव आलेत. त्यामुळे त्या नावांचा उल्लेखही केला गेला नाही. पण अल्ताफ, हुसेन ही नावे आली, तर लगेच बाहेर पडतात. सर्व प्रसार माध्यम हे मुस्लिम द्वेषी असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
औरंगजेब या मातीतला आहे. औरंगजेबाचे फोटो लावले किंवा छापले तर काय फरक पडतो. असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित केला आहे. औरंगजेब कुठून पैदा झाला, हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं. औरंगजेबाच्या फोटोचा इश्यू का केला जातोय, असं थेट सवाल प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित केला आहे.
संजय राऊत आणि शरद पवार यांना मारण्याची धमकी आली आहे. शासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. सत्ता येते आणि जाते. यामध्ये सामान्य माणूस आणि नेता यांची दक्षता घेणे हे शासनाचे काम आहे. हे काम शासन करेल, असं मला वाटते, असंही मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. पोलिसांनी या दोन्ही नेत्यांना सुरक्षितता दिली पाहिजे. राजकीय नेते काय सांगतात. यापेक्षा पोलीस खात्याकडे संरक्षणाची जबाबदारी आहे. त्यांनी ती पार पाडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.