मुंबई : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ईडी आणि सीबीआयला घाबरून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असा आरोप त्यांनी त्यांच्यावर केला. त्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यावरूनच आता ठाकरे गट आणि शिवसेना आमनसामने आले आहेत. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले आहेत असं सांगताच त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या आमदारांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावरून आता गुलाबराव पाटील आणि आमदार संतोष बांगर यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
आमदार गुलाबराव पाटील यांच्याकडून सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला जातो, कालच्या टीकेवरूनही त्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
कालच्या एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, गेल्या नऊ महिन्यापासून तु्म्ही तेच सांगता आहात.
त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून नऊ महिने झाले तरी तुम्ही अजूनही तेच सांगत आहात. मात्र राज्याच्या विकासाबाबत तुम्ही काहीच का बोलत नाहीत.
तुमच्या या टीकेमुळे आता राज्यातील जनताही कंटाळली आहे. त्यामुळे आता पक्ष वाढीसाठी तुम्ही प्रयत्न करा, पक्ष वाढाव, सरकार कसं येईल हे बघा असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
एखाद्या घरात तरुण मृत्यू झाला तर त्या त्या लोकंही दहा दिवसानंतर तो मृ्त्यू विसरतात. त्यामुळे आता नऊ महिने झाले आहेत. त्यामुळे तुम्ही आता आम्हाला विसरा असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. तर संतोष बांगर यांनी आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यामध्ये कोणतंही तथ्य नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.