जळगाव | 14 March 2024 : खानदेशमध्ये भाजपने मोठा खांदेपालट केला. जळगाव लोकसभा मतदार संघासाठी नारी शक्तीचा हुंकार भरला. गेल्यावेळी हुकलेली संधी स्मिता वाघ यांच्याकडे यावेळी चालून आली. भाजपने लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली. सध्याचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यात आले आहे. गेल्यावेळी पाटील हे चाळीसगाव विधानसभेसाठी इच्छुक होते. पण पक्षाने लोकसभेसाठी स्मिता वाघ यांना डावलून पाटील यांना उमेदवारी दिली होती. पक्षाने ही भरपाई आता केली. जाणून घेऊयात कोण आहेत स्मिता वाघ..
अभाविपपासून सुरुवात
स्मिता वाघ यांची सुरुवातीपासूनच भाजपशी वैचारिक नाळ जोडलेली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासूनच त्यांची या पक्षाशी बांधिलकी होती. त्यांचे पती उदय बापू वाघ यांच्यासोबत विद्यार्थीदशेपासूनच त्या राजकारणात सक्रिय होत्या. भाजप जिल्हाध्यक्ष उदय बापू वाघ हे जिल्हा परिषद सदस्य आणि बाजार समितीवर होते. तर स्मिता वाघ या जिल्हा बँकेवर तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांनी मिनी मंत्रालयात पण उमेदवारी केली. जिल्हा परिषद सदस्य आणि नंतर अध्यक्ष पदावर त्यांनी दमदार कामगिरी बजावली. विधान परिषदेत ही त्यांनी पक्षाचे प्रतिनिधीत्व केले.
पक्षाशी बांधिलकी कायम
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी त्या इच्छुक होत्या. भाजपने पण त्यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यांच्या प्रचाराचा नारळ पण फुटला. कार्यकर्ते पण कामाला लागले. पण ऐनवेळी उन्मेश पाटील यांचे नाव पक्के झाले. स्मिता वाघ यांची उमेदवारी गेली. पण पाटील यांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही. उलट पाटील यांचा अर्ज भरतानाही त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पक्षाचे काम नेटाने सुरु ठेवले. चाळीसगाव विधासभेसाठी उन्मेष पाटील इच्छुक असल्याचे समोर आल्यानंतर पक्षाने यंदा लोकसभेसाठी त्यांचा पत्ता कट केला. स्मिता वाघ यांना तिकीट जाहीर केले. निष्ठावंतांना डावलण्यात येत नाही. त्यांच्या निष्ठेला फळ मिळतेच, असा संदेश जणू भाजपने दिला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्ते पुन्हा जोमाने प्रचाराला लागले आहेत.