जळगाव : उद्धव ठाकरे यांनी ऐकलं नाही. म्हणून दुसरा मार्ग पत्करला अशी खंत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. गुलाबराव साधा नाही, सुगंधासोबत काटेही आहेत, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. नव्या वर्षात शिंदे-फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करणार असल्याचंही गुलाबराव पाटील म्हणाले. गेली नऊ वर्षे लोकं वेगवेगळे कार्यक्रम साजरे करतात. मी मतदारसंघात फिरतोय. शिवसेनेचं वैभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये उभं करण्याचा संकल्प घेतलाय, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक स्वप्न आहे, हर घर जल, हर घर नल. २०२४ मध्ये या गुलाबराव पाटीलला पाणीवाला बाबा म्हणून ओळखतील.
ग्रामपंचायतीची बॉडी बिनविरोध निवडून आली. आम्ही प्राक्टिकली सिझनेबल पुढारी नाहीत. पाऊस आला नि छत्री उघडली. आमचं दुकान दैनंदिन सुरू आहे. दैनंदिन आमचं ओपीडी सुरू आहे. सकाळी आलात तर रोज आमचा जनता दरबार असतो. हजारो लोकं समस्या घेऊन येतात. कोणी कितीही आरोप केलेत, तरी मैदानात येऊ द्या, बघुया, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
टीका माझ्यावर करायला पाहिजे. ज्या झाडाला फळ असतात, त्या झाडाला लोकं दगडं मारतात. गुलाबराव साधा थोडी आहे. त्याला सुगंध आहे. तसे काटेपण आहेत. ज्यावेळी शिवसेनेत हा प्रकार घडला. उद्धव ठाकरे यांनी ऐकूण घेतले नाही. नाईलाजानं आम्हाला पक्ष टिकविण्याकरिता नवीन मार्ग पत्करावा लागला. तो माझ्या जीवनातला सर्वात दुःखाचा क्षण आहे, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.