जळगाव : जामनेरहून जळगावला परतणाऱ्या बसवर दगडफेक करणाऱ्या जामनेर आगाराच्या कंडक्टरला बस कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. नेरीजवळ गाडेगाव घाटात शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. उमेश आवटी असे ताब्यात घेतलेल्या बस वाहकाचे नाव आहे. सोशल मीडियावरील पोस्ट वाचून भावनेच्या भरात हे कृत्य घडल्याचे त्याने पोलीस जबाबात सांगितले.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनानुसार जळगाव आगाराची पहिली बस क्र. MH 20 BL 3451 जामनेर येथे रवाना झालेली होती. जामनेर येथून दुपारी 2 वाजता परतीचा प्रवास करीत होती. नेरी जवळील गाडेगाव घाटात एका आयशर ट्रक क्रमांक MH 04 EY 7125 मागे उमेश आवटी नावाचा जामनेर आगाराचा वाहक लपून बसला होता. बस घाटात येतात त्याने धारदार दगड बसच्या काचेवर भिरकावला. एसटी बस चालक सोपान सपकाळे चालक यांनी प्रसंगावधान राखून जागेवर वळण घेतल्याने बसची समोरील काच थोडक्यात बचावली.
यावेळी बसमध्ये साध्या वेशात बसलेले पोलीस तसेच जळगाव आगारातील वाहक गोपाळ पाटील यांनी संबंधित व्यक्तीचा पाठलाग केला. पोलीस आणि पाटील यांनी पाठलाग करीत जवळच एका शेतात उमेश आवटी याला पकडले. यासंदर्भात जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे. याप्रसंगी पोलीस ठाण्यात जामनेर आगार व्यवस्थापक कमलेश धनराळे, वाहतूक नियंत्रक संभाजी पाटील उपस्थित होते.
दरम्यान एसटीचे विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार, असे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सांगितले. आम्ही कष्टकऱ्यांचा लढा सुरूच ठेवणार आहोत. डंके की चोटपर आमचा लढा सुरूच राहील, असे ते म्हणाले. (Stone throwing on ST from ST conductor in Jalgaon)
इतर बातम्या